अनेक वर्षांपासून तुळशीचा वापर धार्मिक पूजेसाठी आणि इतर कामांसाठी केला जात आहे. तसेच आयुर्वेदामध्ये सुद्धा तुळशीच्या पानांना विशेष महत्व आहे.
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या तुळशीच्या पानांचे सेवन केल्यामुळे त्वचेसह आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर तुम्ही नियमित एक तुळशीचे पान खाऊ शकता. तुळशीच्या पानांचे सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते, पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तुळशीच्या पानांचे वेगेवेगळ्या पद्धतीने सेवन केले जाते. काही लोक तुळशीच्या पानांचा चहा बनवून पितात तर काहींना तुळशीच्या पानांचे पाणी बनवून पितात. हे पाणी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तुळशीचे पानांचे पाणी कसे बनवावे? तुळशीच्या पानांचे पाणी प्यायल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
सर्वप्रथम 7 ते 8 तुळशीची पाने घेऊन स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर टोपात पाणी गरम करायला ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात तुळशीची पाने टाकून काही वेळ उकळण्यासाठी ठेवा. पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतर गॅस बंद करून पाणी गाळून घ्या. त्यानंतर तुळशीच्या पानांत तुम्ही मध मिक्स करून पिऊ शकता.
सर्दी, खोकला झाल्यानंतर तुळशीचे पाणी प्यायल्यास सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो. यामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे घशाला आलेली सूज कमी होते. तसेच हे पाणी तुम्ही पित असाल तर तुम्हाला सर्दी किंवा खोकला होणार नाही.
शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी तुळशीची पाने अतिशय प्रभावी आहेत. तुळशीच्या पानांमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच बिघडलेली पचनक्रिया सुधारते.
तुळशीच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आढळून येतात. ज्यामुळे चेहऱ्यावर आलेले पिंपल्स नाहीसे होतात. पिंपल्सपासून त्वचेचा बचाव करण्यासाठी नियमित तुळशीच्या पानांचे सेवन करावे किंवा तुळशीचे एक पान चावून खावे.
तुळशीच्या पानांचे सेवन केल्यामुळे मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते. यामध्ये ॲडाप्टोजेन नावाचा घटक आढळून येतो, ज्यामुळे ताण तणाव कमी होऊन आरोग्य सुधारते. या पाण्याचे नियमित सेवन केल्यास मन शांत होते.