जगातील सर्वात धोकादायक जमात कोणती आहे? तुम्हाला माहिती आहे का? या जमातीचे लोक आजही मुख्य प्रवाहापासून आणि जगातील इतर लोकांपासून खूप दूर राहतात. त्यांच्या भागात कोणी पोहोचलं तर ते त्याला ठार मारतात.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की ही या जमातीचे लोक भारतातील एका बेटावर राहतात. चुकूनही इथे कोणी गेला तर त्याचं जिवंत परत येणं जवळपास अशक्यच आहे.
हे लोक 30 हजार वर्षांहून अधिक काळ जगापासून अलिप्त राहत आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे बेट कुठं आहे आणि त्याचं नाव काय आहे? अंदमानचे नॉर्थ सेंटिनेल बेट जगातील सर्वात धोकादायक मानले जाते. इथे राहणाऱ्या जमातीने स्वतःला संपूर्ण जगापासून तोडलं आहे. सर्व प्रयत्न करूनही त्यांनी मुख्य प्रवाहात येण्याची तयारी दाखवली नाही. नॉर्थ सेंटिनेल बेटावर राहणाऱ्या जमातीने 2018 मध्ये ख्रिश्चन मिशनरी जॉन ॲलन चाऊ यांची हत्या केल्यावर लोकांचं लक्ष वेधलं गेलं.
जॉनने नॉर्थ सेंटिनेल बेटाचं वर्णन “पृथ्वीवरील सैतानाचा शेवटचा किल्ला” असं केलं होतं. या जमातीच्या लोकांनी यापूर्वीही त्यांच्या बेटावर पोहोचलेल्या सर्व लोकांना ठार मारलं होतं. ही एकमेव जमात आहे, ज्यांच्या जीवनात किंवा अंतर्गत बाबींमध्ये भारत सरकार हस्तक्षेप करत नाही. तसंच बाहेरील लोकांना येथे जाण्यास शासनाने बंदी घातली आहे.
अलीकडेच सापडलेल्या कागदपत्रांवरून हे दिसून येतं की सेंटिनेल बेटावर राहणारी जमात बाहेरील लोकांना आपला शत्रू का मानते. याचं खरं ते अपहरण, आजारपण असल्याचं सांगतात. उत्तर सेंटिनेल बेटावर हल्ला केला तेव्हा कॅनडात जन्मलेले वसाहती प्रशासक मॉरिस विडाल पोर्टमन हे रॉयल नेव्हीचे कमांडर होते. हा हल्ला यशस्वी झाला नसला तरी बाहेरच्या लोकांबद्दल शत्रुत्वाची भावना या जमातीत निर्माण झाली असे म्हणतात. हल्ल्यानंतर, पोर्टमनने दोन सेंटिनेलीज प्रौढ आणि चार मुलांचे अपहरण केले आणि त्यांना दक्षिण अंदमान बेटांची राजधानी पोर्ट ब्लेअर येथे नेले.
पोर्टमॅनने अपहरण केलेल्या लोकांमुळे बेटावर महामारी पसरली. असे म्हटले जाते की हजारो वर्षे बाकी जगापासून वेगळं राहणाऱ्या सेंटिनेलीजमध्ये अनेक सामान्य आजारांसोबत लढण्यासाठीची प्रतिकारशक्ती नव्हती. अशा परिस्थितीत अपहरण झालेले लोक लगेचच आजारी पडले. प्रौढ मरण पावले. मात्र, या आजारातून लहान मुलं बरी झाली. अशा स्थितीत त्यांना पुन्हा बेटावर पाठवण्यात आलं. पण त्या मुलांमध्ये आजार कायम होते, ज्यामुळे इथल्या लोकांमध्ये भयंकर महामारी पसरली. अशा परिस्थितीत, हे लोक बाहेरच्या जगापासून लांब राहण्यामागे हा अनुभव कारणीभूत असावा असा अंदाज आहे.