श्रीगुरुदेव दत्त यांची मार्गशीर्ष पौर्णिमेला जयंती साजरी केली जाते. ऋषी अत्री आणि अनुसया याच्या पोटी श्री दत्तात्रेय भगवान यांनी जन्म घेतला होता. हिंदू पौराणिक मान्यतेनुसार, देव दत्तात्रेयांमध्ये त्रिदेवाची शक्ती अस्तित्वात आहे, म्हणून त्यांची पूजा केल्याने लवकर लाभ होतो.
दत्त उपासक मोठ्या भक्तीभावाने श्री गुरुदेव दत्तांची उपासना करतात. दत्तात्रयांचे पूजन झाल्यावर दत्तात्रयांची आरती म्हणा.
“दत्तात्रेयांची आरती”
श्रीगुरुदत्तराज मुर्ती, ओवाळीतो प्रेमे आरती।।
ब्रम्हा विष्णु शंकराचा, असे अवतार श्रीगुरुंचा।
कराया उद्धार जगाचा, जाहला बाळ अत्री र्ऋषींचा।
धरीला वेष असे यतीचा, मस्तकी मुकुट शोभे जटीचा।
कंठी रुद्राक्ष माळ धरुनी।
हातामध्ये आयुध बहुध धरुनी।
तेने भक्तांचे क्लेष हरुनी।
त्यासी करुन नमन।
अध शमन होइल रिपु दमन।
गमन असे त्रेलोक्यावरती।
ओवाळीतो प्रेमे आरती, श्रीगुरुदत्तराज मुर्ती, ओवाळीतो प्रेमे आरती।।
गाणगापुरी वस्ती ज्यांची, प्रिती औदुंबर छायेची।
भिमा अमरजा संगमाची, भक्ती असे बहुध शिष्यांची।
वाट दाखवुनिया योगाची, ठेव देत असे निज मुक्तीची।
काशी क्षेत्री स्नान करितो।
करविरी भिक्षेला जातो।
माहुर निद्रेला वरितो।
तरतरीत छाटी,गरगरीत नेत्र,शोभतो त्रिशुल जया हाती। ओवाळीतो प्रेमे आरती,
श्रीगुरुदत्तराजमुर्ती।।
अवधुत स्वामी सुखानंदा, ओवाळीतो सौख्यकंदा।
तारी हा दास हृदयकंदा, सोडवी विषय मोह छंदा।
आलो शरण अत्रिनंदा, दावी सतगुरु ब्रम्हानंदा।
चुकवी चौऱ्यांशिचा फेरा।
घालीती षड्रिपु मज घेरा।
गांजिती पुत्र पौत्र दारा।
वदनी भजन मुखी।
तव पुजन करितसे ।
सुजन जयांचे बलवंतावरती।
ओवाळीतो प्रेमे आरती, श्रीगुरुदत्तराज मुर्ती, ओवाळीतो प्रेमे आरती।।
….
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा ।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना ॥
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥
जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥
सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त ।
अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥
पराही परतली तेथे कैचा हेत ।
जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥
दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।
भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥
दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।
हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥