टेनिस खेळाडूने डोक्यात मेडल घालून आईला संपवलं,कोच बनून बापानेच लचके तोडले, आईनेही दिली साथ ..
टेनिस खेळाडू असलेल्या तानिया नावाच्या मुलीने आपल्याच आईचा खून केल्याची घटना घडली आहे. तिने ट्रॉफी आणि मेडल्सचा वापर करून आईच्या डोक्यावर अनेक वार केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या आईचा मृत्यू झाला. मंजूदेवी (वय 40 वर्षं) असं मृत महिलेचं नाव आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, तानियाच्या घरातला गोंधळ ऐकून काही शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत मंजूदेवी यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला. शेजारच्या लोकांनी तानियाविरुद्ध पोलिसांसमोर जबाब दिल्याने पोलिसांनी आरोपी तानियाला अटक केली. तानियाने सुरुवातीला गुन्हा कबूल करण्यास नकार दिला होता; मात्र नंतर तिने एक धक्कादायक खुलासा केला.
तानिया म्हणाली, “माझे वडील टेनिस कोच आहेत. ते लहानपणापासून माझं लैंगिक शोषण करत आहेत. हे मी माझ्या आईला सांगितल्यावर तिने काहीही केलं नाही. तिने मला साथ द्यायला हवी होती; पण ती गप्प राहिली. शनिवारी माझ्या आईने मला तोकडे कपडे घालण्यावरून हटकलं तेव्हा माझा तिच्याशी वाद झाला. माझ्या मनात तिच्याविरुद्ध आधीच राग होता. वाद झाला तेव्हा मला आणखी राग आला. घरात ठेवलेल्या ट्रॉफीज आणि मी जिंकलेली सर्व मेडल्स घेऊन मी माझ्या आईवर हल्ला केला. मी तिला बेदम मारलं. ती मेल्यानंतर मला शांती मिळाली. तिला मारल्याबद्दल मला अजिबात पश्चाताप वाटत नाही.”
पोलिसांनी यानंतर तानियाचे वडील आणि टेनिस कोच द्वीपचंद प्रसाद यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं. तानियाने केलेले सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले. ते म्हणाले, की त्यांच्या मुलीला स्वप्नरंजनात रमण्याची सवय आहे. तिच्या या सवयीमुळे ते आणि त्यांची पत्नीदेखील चक्रावले होते.
तानियाच्या शेजाऱ्यांनी सांगितलं, की हे कुटुंब हंगराबारीतल्या पूर्णिमा मॅन्शनमध्ये खूप दिवसांपासून राहतं. शनिवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास द्वीपचंद प्रसाद टेनिस कोचिंगसाठी बाहेर गेले होते. घरातून तान्या आणि मंजू यांच्या भांडणाचा आवाज ऐकू आला. शेजाऱ्यांनी खूप वेळ दरवाजा ठोठावला. थोड्या वेळाने तानियाने दरवाजा उघडला. तिचे हात रक्ताने माखलेले होते. आपण आईला मारल्याचादेखील उल्लेख तिने केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तानियाची मानसिक स्थिती ठीक नाही. तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तिने खुनाची कबुली दिली आहे. तिच्या वडिलांचीही चौकशी सुरू आहे. पोस्टमॉर्टेम रिपोर्ट्स आल्यानंतर पुढची कारवाई केली जाईल.