क्राईम

Pune Crime: करणी केली आर्थिक प्रगती होत नाही; मग संधी साधत डोक्यात घातला दगड, भोर तालुक्यात घडला भयानक प्रकार


Crime News : रोजच्या प्रमाणे गणपत गेनबा खुटवड ही व्यक्ती रविवार दि. २२ सप्टेंबरच्या रात्री नसरापूर येथून आपल्या घरी यायला निघाला. रात्रीची वेळ होती. पुढे जाऊन आपल्याबरोबर एक भयानक प्रसंग घडणार असून आपल्यासाठी ही काळ रात्र ठरणार आहे, याची त्यांना पुसटशी कल्पनाही नव्हती.

गणपत खुटवड हे दुचाकीवरून हातवे बु. येथील गुंजवणी नदीच्या बंधाऱ्यावरील पुलाजवळ पोहोचले आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यावेळी त्याठिकाणी नक्की काय घडले ? कशामुळे घडले ? याबाबत कोणालाही कसलीच माहिती नव्हती.

 

यादरम्यान त्याच रविवारच्या रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांचे पुतणे संदीप खुटवड यांना फोन आला की, मयत गणपत खुटवड यांची मोटारसायकल ही हातवे बु. येथील बंधाऱ्याच्या सुरक्षा कठड्याला लटकताना दिसत आहे. त्यानंतर संदीप खुटवड यांनी नातेवाईक आणि गावातील काही ग्रामस्थांसह घटनास्थळी पोहोचले. तिथे त्यांना गणपत खुटवड यांचा मृतदेह बंधाऱ्याच्या खालच्या बाजुस नदी पात्रात आढळून आला. यावेळी त्यांच्या डोक्यास मार लागून त्यामधून रक्त येत असल्याचे दिसून येत होते.

 

यावेळी नातेवाईकांनी आजुबाजुस शोध घेतला असता त्यांचा मोबाईल व चष्मा रोडच्या पश्चिम बाजुस नदिपात्राच्या उतारावर एकाच जागी सापडला. त्यापासून काही अंतरावर विष्ठा केल्याचे दिसून येत होते. तसेच त्यांच्या पायातील एक चप्पल ही त्याच ठिकाणापासुन पाण्याच्या जवळ सापडली. यानंतर राजगड पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली. परंतु घटनास्थळी आढळनाऱ्या सर्व वस्तू संशयास्पद दिसत होत्या. त्यामुळे नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी या घटनेबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला.

 

या घटनेची पोलिसांनी सखोल चौकशी करण्यास सुरुवात केली.यांनतर राजगड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली. यावेळी पोलिसांनी मयत गणपत खुटवड यांच्या दिनक्रमाची गावपातळीवर माहिती घेतली असता त्यांचे गावातीलच स्वप्निल जानोबा खुटवड (वय ३० वर्ष) या तरुणासोबत वादविवाद असल्याचे समोर आले. रविवारच्या रात्री मयत गणपत खुटवड हे आपल्या गावातून नसरापूर येथे गेले होते.

त्यांच्या मागे स्वप्निल खुटवड हा देखील नसरापूर येथे गेला होता. त्यांनतर साडेदहाच्या सुमारास मयत गणपत खुटवड हे नसरापूर येथून पुन्हा गावाकडे येण्यास निघाले असताना स्वप्निल खुटवड हा देखील त्यांचा पाठलाग करत गेला असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.अखेर पोलिसांनी स्वप्निल खुटवडला खेडशिवापूर मधून ताब्यात घेतले.

 

यादरम्यान स्वप्निल खुटवडने प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांनतर राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गवळी व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत यांनी त्याला विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने सर्व घटनाक्रम सांगण्यास सुरुवात केली, आणि पुढे जे सत्य समोर आले. ते मन सुन्न करणारे होते. त्याने सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

 

“मयत गणपत खुटवड हे काळुबाई देवीचे देवऋषी असून त्यांचे रेशनिंगचे दुकान आहे. त्यांनी मला करणी केली आहे. त्यामुळे माझे रेशनिंग मिळण्याचे बंद झाले असून माझी आर्थिक प्रगती होत नाही. त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबाबत राग होता. त्यामुळे मी त्यांचा पाठलाग करून हातवे बु. गावाजवळील गुंजवणी नदीच्या पुलाजवळ त्यांना अडवून डोक्यावर दगडाने मारहाण करून त्यांचा खून केला व त्यांचा मृतदेह नदीपात्रात टाकून दिला. आणि हा अपघात वाटावा म्हणून त्यांची मोटारसायकल पुलावर सुरक्षा कठड्यालगत अडकवून ठेवली.” असे सांगून स्वप्निलने शेवटी गैरसमजातून खून केल्याचे कबूल केले.

 

स्वप्निल उर्फ बंटी खुटवड यास बुधवारी भोर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या खून प्रकरणाचा काही दिवसातच उलगडा करण्यात सहभागी असणारे पोलीस सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गवळी, स्था.गु.शा.चे सपोनि दत्ताजी मोहिते, सपोनि कुलदीप संकपाळ, पो.स.ई अभिजीत सावंत, अंमलदार अमोल शेडगे, तुषार भोईटे, मंगेश भगत, सागर नामदास, राजु मोमीण, राजगड पोस्टे चे पोसई अजित पाटील, अंमलदार नाना मदने, अक्षय नलावडे यांनी केली


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *