क्राईम

‘बेडरूममध्ये ये, नाहीतर फेल करेन’, सहावीच्या विद्यार्थिनीसोबत अश्लिल कृत्य, शिक्षकाने खाल्ला बेदम मार


Crime News : महिला आणि मुलींशी गैरवर्तन होत असल्याच्या घटना सतत आपल्या कानावर पडत असतात. विद्येचं मंदिर समजल्या जाणाऱ्या शाळा-महाविद्यालयांमध्येसुद्धा मुली सुरक्षित नसल्याचं वेळोवेळी समोर आलं आहे.

उत्तर प्रदेशात सीतापूरमध्ये गुरू आणि शिष्याच्या नात्याला काळिमा फासरणारं एक प्रकरण उघड झालं आहे. एका शिक्षकाने त्याच्याच शाळेत शिकणाऱ्या इयत्ता सहावीतल्या विद्यार्थिनीला घरात ओलीस ठेवल्याचा आरोप आहे. त्याने विद्यार्थिनीशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केला असता तिला मारहाणदेखील केली.

 

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षक महमुदाबाद कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या आशुतोष ब्रजमोहन लाल इंटर कॉलेजमध्ये शिकवतो. याच शाळेत इयत्ता सहावीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजता शाळेत निघाली होती. वाटेत तिला शाळेतल्या संजय गुप्ता या शिक्षकाने अडवलं. त्याने तिला फूस लावून आपल्या घरी नेलं आणि तिला बेडरूममध्ये येण्यास सांगितलं. शिक्षकाचं म्हणणं ऐकून घाबरलेल्या विद्यार्थिनीने तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शिक्षकाने तिला नापास करण्याची धमकी दिली.

 

त्यानंतर शिक्षकाने तिच्याशी अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली. तिने विरोध केला असता त्याने तिला मारहाण केली. पीडितेला घरात डांबून आरोपी शिक्षक शाळेत निघून गेला. विद्यार्थिनी शाळेतून न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. गावकऱ्यांनी मुलीला संजय गुप्ताच्या घरी जाताना बघितलं होतं. याबाबत माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीय संजयच्या घरी गेले.

कुटुंबीयांना त्याच्या घरातून मुलीचा विव्हळण्याचा आवाज आला. त्यांनी घरात प्रवेश केला असता एका कुलूप लावलेल्या खोलीतून आवाज येत होता. त्या खोलीत मुलगी अतिशय दयनीय अवस्थेत पडलेली आढळली. मुलीने तिच्या बाबतीत घडलेला घटनाक्रम सर्वांना सांगितला. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी शिक्षकाला बेदम चोप दिला.

कोणी तरी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून संजयची गावकऱ्यांच्या तावडीतून सुटका केली. सध्या आरोपी शिक्षकावर उपचार सुरू आहेत. मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढचा तपास सुरू आहे.

 

काही महिन्यांपूर्वी छत्तीसगडमधल्या नारायणपूर जिल्ह्यातदेखील अशीच घटना घडली होती. तिथे एका शाळेतल्या तीन शिक्षकांनी आठ अल्पवयीन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केला होता.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *