क्राईम

सॉरी आई, मी तुझा खून केला! पोटच्या मुलानं आईलाच क्रूरपणे संपवलं अन् , नंतर.


तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या मुलाने आपल्या जन्मदात्या आईची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्येनंतर या निर्दयी मुलाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरीला आईसोबतचा एक सेल्फीही शेअर केला.

‘सॉरी आई, मी तुझा खून केला. तुझी कायमच आठवण येईल. ओम शांती’, असे या फोटोवर आरोपी मुलाने लिहिले.

गुजरातमधील राजकोट येथे ही खळबळजनक घटना घडली असून एका व्यक्तीने याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि क्रूर मुलालाही अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी स्वत: एफआयआर दाखल करत महिलेच्या अंत्यसंस्काराचीही व्यवस्था केली.

‘इंडिया टूडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना राजकोट शहरातील सरकारी क्वार्टरमध्ये घडली आहे. निलेश (वय – 21) असे आरोपी मुलाचे नाव आहे, तर ज्योतिबेन गोसाई (वय – 48) असे मयत महिलेचे नाव आहे. आत्महत्येपासून रोखल्याने मुलाने आईचा निर्घृणपणे खून केला. पोलीस चौकशीमध्ये मुलानेही खुनाची कबुली दिली आहे.

राजकोट वेस्ट झोनचे एसीपी राधिका भारद्वाज यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, भरत नावाच्या एका व्यक्तीने फोन करून निलेशने आपल्या आईची हत्या केल्याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह ताब्यात घेतला आणि मुलाला अटक केली. पोलीस चौकशीमध्ये मुलाने मानसिक त्रागातून आईला संपवल्याचे सांगितले.

आरोपीची आई ज्योतिबेन यांना अनेक वर्षापासून मानसिक आजार होता. यामुळे 20 वर्षांपूर्वीच वडिलांनी निलेश आणि त्याच्या आईला सोडून दिले होते. तेव्हापासून मायलेक सोबत रहात होते. एक महिन्यापूर्वी ज्योतिबेन यांनी मानसिक आजारांवरील गोळ्या घेणे बंद केले. त्यामुळे त्यांची तब्येत हळूहळू आणखी बिघडू लागली. यामुळे या मायलेकामध्ये वारंवार भांडण होत होते. याच त्रागातून आरोपीने चाकू खुपसून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र आईने त्याला रोखले आणि हातातून चाकू हिसकावून घेतला. त्यामुळे संतापलेल्या आरोपीने चादरीने गळा घोटून आईचाच जीव घेतला. त्यानंतर इन्स्टा स्टोरीवर आईसोबतचा फोटो टाकत त्यावर ‘ Sorry mom, I killed you, I miss you’, असे लिहिले.

दरम्यान, आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी ज्योतिबेन यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी महिलेच्या पतीला फोन करत याबाबत माहिती दिली. मात्र त्याने मृतदेह घेऊन जाण्यास नकार दिला. यानंतर पोलिसांनी स्वत: महिलेच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था केली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *