पाटणा : शिक्षण म्हणा किंवा नोकरी बऱ्याच मुली आपल्या कुटुंबापासून दूर भाड्याच्या घरात राहतात. खर्च विभागला जावा म्हणून मुली-मुली एकत्र राहतात. अशाच 9 मुली एकत्र एका भाड्याच्या खोलीत राहत होत्या.
पोलिसांनी एकदा त्यांच्या घरावर धाड टाकली. त्यानंतर जे दृश्य दिसले ते पाहून पोलीसही हादरले.
पाटण्याच्या बिर्ला कॉलनीत गेल्या सहा महिन्यांपासून 9 मुली भाड्याच्या घरात राहत होत्या. मुली सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथेच राहायच्या आणि मग बाहेर न जाता फोनवर बोलत राहायच्या. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी छापा टाकला. खोलीतील दृश्य पाहून सर्वजण थक्क झाले. पोलिसांनी एकूण 9 मुलींना अटक केली आहे.
मुली नेमकं करायच्या काय?
मुली एका बनावट कॉल सेंटरमध्ये काम करत होत्या. या बनावट कॉल सेंटरचा संचालक फैजान हा फुलवारी शरीफ येथील रहिवासी आहे. फैजानने स्वतः मुलींना त्याच्या बनावट कॉल सेंटरमध्ये कामावर ठेवलं होतं. मुलींसोबत काही तरुणही हे काम करत होते. आरोपी प्रत्येकाला दरमहा दीड ते दोन लाख रुपये पगार देत असे.
चौकशीदरम्यान मुलींनी सांगितलं की त्या कॉल सेंटर असल्याचं समजून कामावर आल्या होत्या. नंतर ही टोळी सायबर फसवणूक करत असल्याचं निष्पन्न झालं. ऑनलाइन शॉपिंगच्या नावाखाली सर्वसामान्यांची फसवणूककरणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पाटणा सायबर पोलीस स्टेशनने पर्दाफाश केला.
कशी करायचे फसवणूक
जेव्हा एखादा ग्राहक Amazon, Flipkart सारख्या वेबसाइटवरून खरेदी करत असे आणि वस्तू परत करत असे. यावेळी त्यांना पैसे परत मिळण्यात अडचण आल्याने त्यांनी संबंधित वेबसाइटच्या कस्टमर केअरला फोन केला. या टोळीने अनेक ई-कॉमर्स कंपन्यांच्या बनावट वेबसाइट तयार केल्या होत्या. यामुळे ग्राहकांचा फोन त्यांच्यापर्यंत पोहोचायचा.
किओस्कवर बसलेली तरुणी पैसे परत करण्याच्या बहाण्याने ग्राहकाकडून आधार कार्ड क्रमांक, पॅन क्रमांक आदींची मागणी करत असे. त्यानंतर ती ग्राहकाच्या मोबाईलवर रिमोट ऍक्सेस ॲप इन्स्टॉल करून त्याच्या खात्यातून पैसे काढायची. ही टोळी सहा महिन्यांपासून बिर्ला कॉलनीतून फसवणुकीचा धंदा चालवत होती. पोलिसांनी घटनास्थळावरून 9 संगणक, 3 लॅपटॉप, 5 सिमकार्ड आणि 17 मोबाईल जप्त केले आहेत. टोळीचा म्होरक्या फौजानच्या शोधात पोलीस छापे टाकत आहेत.