मुंबई : प्रत्येकजण आपल्या आरोग्याची काळजी घेत असतो. त्यासाठी काहीही उपचार करण्यास तयार होतो. कोणतेही उपचार करण्याआधी तो रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करतो, पण काही ठिकाणी असे काही प्रकार उघडकीस येत आहे ज्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे.
त्यामुळे यांना वेळीच रोखणे गरजेचे असते. दरम्यान एका बोगस डॉक्टरने तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे नालासोपारा (Nalasopara) येथे एकच खळबळ उडाली आहे.
एक बोगस डॉक्टर 22 वर्षीय तरुणीवर उपचार करत होता. पण त्याच्या मनात वेगळेच विचार सुरु होते. त्याने डॉक्टरी पेशाला काळीमा फासला. आणि उपचाराच्या नावाखाली त्या रुग्ण तरुणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आलीय. नालासोपारा येथील पश्चिमेच्या छेडा नगर मधील गौरव गॅलक्सी इमारतीत डॉ. बाबासाहेब पाटील यांचा दवाखाना आहे. ती 22 वर्षीय तरूणी मुळव्याधीच्या उपचारासाठी डॉ. बाबासाहेब पाटील या बोगस डॉक्टराच्या दवाखान्यात आली होती. त्यावेळी डॉ. पाटील याने तिच्याकडे शरिरसुखाची मागणी केली. तरुणीने नकार देताच त्या डॉक्टराने बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरुणीने दिला आहे.
बाबासाहेब पाटील याच्याविरोधात बलात्कार (कलम 376) आणि विनयभंग (कलम 354) अनव्ये गुन्हा दाखल केला आहे. तसेच डॉ. पाटीलबद्दल आणखी माहिती उघडकीस आली. पाटील हे डॉक्टर नसून त्यांच्याकडे कुठलीही वैद्यकीय पदवी नसल्याचा प्रकार समोर आला. असे असतानाही पाटील हे आपण वैद्य असल्याचा दावा करत होते. एक दोन नव्हे तर मागील 30 वर्षांपासून तो मुळव्याधीवर उपचार करत असल्याची माहिती समोर आलेली आहे.