क्राईम

डोळ्यादेखत झाली मुलीची हत्या; आईने घेतला असा बदला उडाला थरकाप


बंगळुरू : आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते, असं म्हणतात. मुलांवर काही संकट आलं तर ती स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांचा जीव वाचवते. अशात जर पोटच्या लेकीचा डोळ्यांदेखत कोणी खून केला तर, त्या आईची काय अवस्था होत असेल, याची कल्पना करणंही थरकाप उडवणारं आहे.

कर्नाटकमधून अशीच एक घटना समोर आली आहे. मात्र, यानंतर बदला घेण्यासाठी या आईने जे काही केलं, ते आणखीच धक्कादायक होतं.
मुलीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आईने आरोपीचा जीव घेतला. ही घटना बंगळुरूच्या जयनगर येथून समोर आली आहे. यात एका 44 वर्षीय व्यक्तीने 24 वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून हत्या केली. त्यानंतर मुलीच्या आईने आरोपीचा दगडाने ठेचून खून केला. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेशने आधी मुलीवर चाकूने दोन वार केले. हा सर्व प्रकार मुलीच्या आईला दिसताच तिने मागून येऊन आरोपीच्या डोक्यात दगडाने वार केले.
आरोपीवर वार करून आई मुलीला वाचवण्यासाठी धावली. मात्र, तोपर्यंत मुलीचा मृत्यू झाला होता. तर दुसरीकडे मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचाही मृत्यू झाला होता. पोलिसांनी सांगितलं की, 24 वर्षीय तरुणी आणि सुरेश दोघेही गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. दोघांचं प्रेमप्रकरण असल्याचं बोललं जात आहे. प्राथमिक तपासानुसार पार्कमध्ये तरुणी आणि सुरेश यांच्यात भांडण झालं होतं. कारण पीडित तरुणी काही काळापासून सुरेशपासून अंतर राखत होती. सुरेशला हे सर्व आवडलं नाही.
बोलण्याच्या बहाण्याने त्याने तरुणीला शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता पार्कमध्ये बोलवलं. दुसरीकडे, मुलीने आईला सांगितलं की ती पार्कमध्ये कोणालातरी भेटायला जात आहे. आईला काहीतरी संशय आल्याने तिने मुलीचा पाठलाग केला. पार्कमध्ये पोहोचताच तिची मुलगी सुरेशशी बोलत असल्याचं तिला दिसलं. अचानक दोघांमध्ये भांडण झालं, त्यानंतर सुरेशने तरुणीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. यामुळे तरुणीने आरडाओरडा सुरू केला. तर दुसरीकडे आईने आपल्या मुलीला आरडाओरडा करताना पाहिल्यानंतर तिने तिकडे धाव घेतली. त्यानंतरही सुरेश सतत तरुणीवर चाकूने हल्ला करत होता. त्यानंतर मुलीच्या आईने मुलीला वाचवण्यासाठी सुरेशच्या डोक्यात दगडाने वार केले. त्यामुळे सुरेशचा मृत्यू झाला.

जेव्हा आई तिच्या मुलीकडे पोहोचली तेव्हा तिला दिसलं की मुलीचाही मृत्यू झाला आहे. प्रकरण पोलिसात पोहोचल्यावर मुलीच्या आईला अटक करण्यात आली. तिची चौकशी सुरू आहे. याशिवाय पोलीस घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या इतर लोकांचीही चौकशी करत आहेत. डीसीपींनी सांगितलं की, दोघेही एकमेकांना पाच वर्षांपासून ओळखत होते. ते एकाच ऑफिसमध्ये काम करायचे. मुलगी केअरटेकर होती, तर सुरेश कंपनीत इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करत होता. तरुणी काही दिवसांपासून सुरेशपासून अंतर राखण्याचा प्रयत्न करत होती. या घटनेबाबत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *