कर्नाटकातील (Karnataka) बेंगळुरु दुहेरी हत्याकांडाने हादरले आहे. बेंगळुरुमध्ये १८ एप्रिलला दोन जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीची चाकूने भोसकून हत्या केली.
या तरुणीच्या आईने मुलीच्या हत्येचा बदला घेतला. या महिलेने मुलीची हत्या करणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये वीट घालून त्याची हत्या केली. या घटनेमुळे बेंगळुरुमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला अटक केली. तर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, हत्येची ही घटना दक्षिण बेंगळुरूमधील एका पार्कमध्ये घडली आहे. या हत्येने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मृत सुरेश हा शहरातील गोरगुंटे पाल्या परिसरातील रहिवासी होता. तर सुरेशची प्रेयसी अनुषा शाकंबरी ही देखील याठिकाणी राहत होती. याप्रकरणी पोलिसांनी अनुषाची आई गीताला अटक केली असून तिची चौकशी करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश आणि अनुषा एकत्र काम करत होते आणि ते रिलेशनशिपमध्ये होते. सुरेशचे आधीच लग्न झाले होते. अनुषाला सुरेशसोबतचे नाते संपवायचे होते. तिची समजूत काढण्यासाठी सुरेशने तिला शिवमंदिर पार्क येथे भेटायला बोलावले होते. अनुषासोबत तिची आई गीताही पार्कमध्ये आली होती. सुरेश अनुषाला एकत्र राहण्यासाठी समजून सांगत होता. पण अनुषा त्याला नकार देत होती.
अनुषाने नकार दिल्यामुळे सुरेश संतप्त झाला. त्याने सोबत आणलेला चाकू काढून अनुषावर हल्ला केला.चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अनुषाचा जागीच मृत्यू झाला. अनुषासोबत आलेल्या तिच्या आईने सुरेशला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो अनुषावर हल्ला करतच राहिला. शेवटी अनुषाच्या आईने सुरेशच्या डोक्यामध्ये सिमेंटची वीट मारली. डोक्याला वीट लागल्यामुळे सुरेश देखील गंभीर जखमी झाला आणि त्याचा देखील जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच बेंगळुरु पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अनुषाची आई गीताला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी गीताविरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक केली. सध्या तिची चौकशी सुरू आहे. बेंगळुरु पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणी दोन गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. एक गुन्हा अनुषाच्या हत्येप्रकरणी सुरेशविरोधात तर दुसरा सुरेशची हत्या केल्याप्रकरणी अनुषाची आई गीताविरोधात दाखल करण्यात आला आहे.