लखनऊ : लग्न म्हटलं की कोणताही माणूस अतिशय विचार करून निर्णय घेतो. आपला जोडीदार आपल्यासाठी योग्य असावा, याची प्रत्येकजण काळजी घेतो. मात्र, काहीवेळा लग्नानंतर आपल्याला एकमेकांमधील दोष दिसू लागतात आणि मग काहीवेळा यात हे नातंच तुटतं.
मात्र, तुम्ही कधी ऐकलंय का की इंग्रजी बोलता न आल्याने कुणाचं लग्न मोडलं. असा विचारही सहसा कोणाच्या मनात येत नसेल. मात्र, उत्तर प्रदेशातील आग्रा येथे असेच एक प्रकरण समोर आलं आहे, ज्यात इंग्रजी बोलता येत नसल्याने लग्न मोडलं.
आश्चर्याची बाब म्हणजे वर्षभरापूर्वी भेटल्यानंतर दोघांनी तीन महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह केला होता. हा तरुण गुरुग्राममधील एका खासगी बँकेत काम करतो. तो दक्षिण भारतातील आहे, त्यामुळे त्याला हिंदी येत नाही. सुमारे एक वर्षापूर्वी तो आग्रा येथे ट्रेनिंगसाठी आला होता. त्याचवेळी आग्रा येथील एका मुलीशी त्याची भेट झाली. त्यानंतर दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनी एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली आणि त्यानंतर तीन महिन्यांपूर्वी लग्न केलं. याप्रकरणी तरुणीने पोलिसांना सांगितलं की, ती सुमारे 15 दिवसांपासून तिच्या माहेरी राहत आहे.
तिचा नवरा इंग्रजी बोलतो, पण तिला इंग्रजी बोलता येत नाही, असं तिने पोलिसांना सांगितलं. ती हिंदीत बोलते आणि तिच्या नवऱ्याला हिंदी समजत नाही. यावरून घरात वाद सुरू होता. पतीने तिच्यावर फक्त इंग्रजीत बोलण्याचा दबाव टाकला. यामुळे ती अस्वस्थ झाली. जेव्हा ती हिंदी बोलायची तेव्हा तिचा नवरा तिच्याशी गैरवर्तन करायचा. अखेर ती 15 दिवसांपूर्वी आई-वडिलांच्या घरी आली .
याप्रकरणी मुलीच्या तक्रारीनंतर पतीला कुटुंब समुपदेशन केंद्रात बोलावण्यात आलं. तो म्हणाला, की तो दक्षिण भारतातील आहे आणि नीट हिंदी बोलू शकत नाही. घरात कोणत्या भाषेत बोलायचं याबद्दल शेवटपर्यंत काहीच ठरलं नाही. यानंतर पतीने पत्नीला सोबत ठेवण्यास स्पष्ट नकार दिला आहे.