मुलानं लव्ह मॅरेज केलं, म्हणून मुलीच्या कुटुंबियांनी मुलाच्या आईचे कपडे फाडले व तिला विवस्त्र करून गल्लीबोळातून पळवलं.
पंजाबच्या तरनतारन जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. एका मुलानं लव्ह मॅरेज केलं, म्हणून मुलीच्या कुटुंबियांनी मुलाच्या आईचे कपडे फाडले व तिला विवस्त्र करून गल्लीबोळातून पळवलं.
त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. पोलिसांनी या घटनेची दखल घेत कारवाई सुरू केली आहे.
समाजात अजूनही लव्ह मॅरेजला विरोध करणारी अनेक कुटुंब आहेत. विशेषतः ग्रामीण भागात, जातीव्यवस्था मानणाऱ्या वर्गात याकडे गांभीर्यानं पाहिलं जातं, पण विरोध करताना माणुसकीदेखील काही वेळा जपली जात नाही, स्त्रियांचा अनादर केला जातो. पंजाबच्या तरनतारन जिल्ह्यात अशीच एक भयानक घटना घडली आहे. एका मुलानं लव्ह मॅरेज केल्याचे परिणाम त्याच्या आईला भोगावे लागले. मुलीकडच्या लोकांनी मुलाच्या आईला विवस्त्र करून तिला गल्लीबोळातून पळवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला गेला.
त्या पीडित महिलेनं वल्टोहा पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली. तिच्या मुलानं शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीच्या मुलीशी कायदेशीर पद्धतीनं लग्न केलं होतं. त्याच रागातून 31 मार्च रोजी संध्याकाळी सहाच्या दरम्यान पाच जणांनी महिलेच्या घराबाहेर येऊन आरडाओरडा सुरू केला. आवाज ऐकून महिला बाहेर गेली असता, कायदेशीर लग्नाचा विषय काढून तिथे असलेल्या लोकांनी तिच्या खांद्यावर हात टाकला आणि तिचा शर्ट फाडला.
महिलेनं मदतीसाठी आवाज दिल्यावर तिचा नवरा घरातून बाहेर आला. तसंच इतरही काही लोक जमा झाले. त्यावेळी आरोपींनी तिचा नग्न अवस्थेतला व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला. या संदर्भात पोलिसांनी तीन जणांची नावं घेत एकूण पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या घटनेतील साक्षीनुसार, आरोपींवर विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांच्या अटकेसाठी छापे घालण्यात आले आहेत, अशी माहिती भीखीविंडचे डीएसपी प्रीत इंदर सिंग यांनी दिली आहे.
या घटनेचे पडसाद जिल्ह्यात उमटत आहेत. महिलांची बदनामी करणाऱ्या, त्यांचं चारित्र्यहनन करणाऱ्या अशा घटनांमुळे जिल्ह्यातलं वातावरण तापलंय. विशेषतः तरनतारन जिल्ह्यातल्या या घटनेची राज्याच्या महिला आयोगानं दखल घेतली असून त्यांनी घटनेबद्दल अहवाल मागवला आहे. तसंच या घटनेत पोलिसांनी काय कारवाई केली याचीही माहिती आयोगानं मागवली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी समाजातून होतेय.