धनबाद : सध्या देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहेत. अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या, तसेच बलात्काराच्याही घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
प्रेमात विश्वासघात झालेल्या एका तरुणीने थेट प्रियकराच्या घरी धाव घेतली. यावेळी तरुणी इतक्या रागात होती की, प्रियकराच्या घरात घुसताच तिने तोडफोड सुरू केली. तरुणीच्या हातात लोखंडी रॉड होता. त्या रॉडच्या सहाय्याने तिने तोडफोड सुरू केली. त्यावेली तिचा राग पाहून प्रियकराच्या कुटुंबीयही काही बोलू शकले नाही. याशिवाय प्रियकराच्या कुटुंबीयांनी तरुणीने दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे.
ही घटना धनबादच्या महुदा पोलीस ठाणे हद्दीतील आहे. ब्रह्मबाबा येथील रहिवासी असलेली एक तरुणी न्यू कॉलनीत बांधकाम सुरू असलेल्या घरात जाऊन तोडफोड केली. पूजा कुमारी असे या प्रेयसीचे नाव आहे. तिने सांगितले की, तिचे महुदा येथील रहिवासी सुधीर चौधरी याच्यासोबत अनेक वर्षांपासून प्रेम होते. या तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. या काळात ती तीन वेळा गरोदर राहिली. मात्र, तिच्या प्रियकराने तिन्ही वेळा तिचा गर्भपात केला. त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणला असता त्याने माघार घेतली.
पूजा कुमारी या तरुणीने सांगितले की, तिच्या प्रियकराने तिला घर तयार झाल्यावर लग्न करेन असे आश्वासन दिले होते. घर बांधण्यासाठी त्याने माझ्याकडून दहा लाख रुपयेसुद्धा घेतले आहे. यासोबतच त्याने आपल्या मित्रांसमोर माझ्याशी लग्नही केले आहे. याचा पुरावा म्हणून फोटोही तिने दाखवला. शेवटी आज या सर्व प्रकाराला कंटाळून तिने त्याच्या घराची तोडफोड केली.
तर या प्रकरणावर तरुणाच्या आईने सांगितले की, एका तरुणीने घरी येऊन तोडफोड केली. तिने 2 लाख रुपयांची मागणीही केली आहे, अशी लिखित तक्रारही दिली आहे. तर पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करुन दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे.