अचानक एका रात्रीत हॉस्पिटल गायब झालं तर? असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. बिहारच्या बगहा येथे एका गर्भवती महिलेच्या मृत्युनंतर अचानक रुग्णालयच गायब झालं आहे.
बगहा येथील मोहम्मद रहमत यांची पत्नी कमरूल निशा यांना प्रसुतीसाठी अनुमंडलीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु तिची प्रकृती गंभीर झाल्याने तिला मोठ्या सरकारी रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, एका आशा सेविकेच्या सांगण्यावरून या कुटुंबाने तिला एका खासगी रुग्णालयात दाखल केलं.
सूरज रुग्णालय असं नाव असलेल्या या खासगी रुग्णालयात कमरुल निशा हिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, तिची प्रकृती आणखी गंभीर झाली तेव्हा या रुग्णालयाच्या डॉक्टरने तिला बतिया इथे रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यावरून कमरुलला बेतिया येथे नेण्यात आलं. तिथेही तिला पाटण्याला नेण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, प्रकृती आणखी गंभीर झाल्याने तिला मोतिहारीच्या रेहमानिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
या रुग्णालयात कमरुलचा मृत्यू झाला. त्यानंतर कमरूलला घेऊन तिचे कुटुंबीय सूरज रुग्णालयात आले. मात्र, एका रात्रीत तिथलं रुग्णालय गायब झाल्याचं पाहून त्यांना धक्का बसला. तिथे रुग्णालयाची इमारत दिसत असली तरी त्याचा कोणताही बोर्ड तिथे नव्हता. इमारतीला टाळं होतं आणि तिथे कोणताही कर्मचारी किंवा फर्निचर दिसत नव्हतं. संपूर्ण रुग्णालयच तिथून बेपत्ता झालं होतं. त्यानंतर कुटुंबीयांमध्ये गहजब झाला.
या प्रकरणी सूरज रुग्णालयावर कारवाई होणार असल्याचं अनुमंडलीय रुग्णालयाचे उपअधीक्षक केबीएन सिंह यांनी म्हटलं आहे. हे रुग्णालय बेकायदा सुरू होतं तरीही त्याच्यावर कारवाई होत नसल्याची माहिती मिळत आहे.