जळगाव : ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेल्या सदस्याला तीन अपत्य असल्याची तक्रार होती. याबाबत अनुकूल अहवाल देण्यासाठी (Jalgaon) जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागात कार्यरत दोन लिपिकांना वीस हजारांची ( Bribe) लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.
जळगाव तालुक्यातील रायपूर ग्रामपंचायत निवडणुकीत तक्रारदार निवडून आले होते. त्यांच्या निवडीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात तीन अपत्य असल्याबाबत ग्रामस्थांकडून तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ग्रामपंचायत विभागात कार्यरत महेश रमेशराव वानखेडे आणि समाधान लोटन पवार या दोघांनी तक्रारदाराला तीन अपत्यबाबत चौकशीसंदर्भात अनुकूल अहवाल तयार करून देण्यासाठी ३० हजारांच्या लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराने याबाबत ९ मार्चला लाचलुचपत विभागात (Jalgaon ACB) तक्रार दिली. तक्रारीची खात्री झाल्यावर पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या पथकाने सापळा रचला. ग्रामपंचायत विभागात कार्यरत संशयित समाधान लोटन पवार यांनी ३० हजारांपैकी २० हजारांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. या प्रकरणी चौकशी सुरु आहे.