मुंबई
कोणत्याही कारणांवरून शाळांमध्ये शिक्षक किंवा विद्यार्थ्यांमध्ये वाद होत असतात. काही वेळा टोकाचे वाद निर्माण होतात आणि त्यावरून गुन्हा दाखल होतो. गाझियाबादमध्ये अशाच प्रकारची एक घटना घडली आहे.
मुख्याध्यापिका आणि एका शिक्षिकेत काही कारणांवरून जोरदार वाद झाला. मुख्याध्यापिकेनं मारहाण केल्याचा आरोप करून शिक्षिकेने त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. आता पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्याने लोकांमध्ये या वादाची जोरदार चर्चा होती. या प्रकरणाच्या तपासातून आणखी कोणत्या गोष्टी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
गाझियाबाद जिल्ह्याच्या मसुरी भागातल्या एका शाळेच्या मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेनं तिच्या शाळेतल्या एका शिक्षिकेला मारहाण करून जातिवाचक अपशब्द वापरल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मसुरी इथल्या जयप्रकाश नारायण सर्वोदय विद्यालयातल्या एका कम्प्युटर शिक्षिकेनं इतर विषय शिकवण्यास नकार दिल्याने शाळेच्या मुख्याध्यापिकेनं तिला मारहाण केल्याचा आरोप आहे.
निग्रावठी गावात राहणाऱ्या अंशिका या दलित शिक्षिकेनं याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, ‘शाळेच्या मुख्याध्यापिका पूनम कुशवाह यांनी चार मार्चला मला कम्प्युटर विषय शिकवण्याऐवजी इतर विषय शिकवण्यास सांगितलं. याबाबत मी उच्च आधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यांनीही मला कम्प्युटरव्यतिरिक्त इतर कोणताही विषय न शिकवण्याची सूचना केली. नंतर मी कम्प्युटरवर काम करण्यासाठी गेले. तेव्हा मुख्याध्यापिका तिथं पोहोचल्या आणि माझे केस पकडून त्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली,’ असा आरोप अंशिका यांनी केला. तसंच त्यांनी जातिवाचक शब्दही वापरले असंही तक्रारदार महिलेने सांगितलं.
या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. मसुरीचे सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) नरेश कुमार यांनी सांगितलं, की पीडितेच्या तक्रारीवरून भारतीय दंड संहितेचं कलम 323 (जाणूनबुजून दुखापत करणं), 506 ( गुन्हेगारी धमकी) आणि अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.