क्राईमनाशिक

पोलीस ठाण्यातच निरीक्षकाने डोक्यात झाडून घेतली गोळी


नाशिक : येथील अंबड पोलिस ठाण्यातील गुन्हेशोध शाखेचे पोलीस निरीक्षकांनी मंगळवारी (ता. २०) सकाळी साडेनऊ-पावणे दहाच्या सुमारास केबिनमध्ये स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉलव्हरमधून डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्त्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

घटनेने नाशिक पोलिस दलासह शहर हादरले असून आप्तांसह मित्र परिवारांमध्ये हळहळ व्यक्त होते आहे. दरम्यान, कौठुंबिक कलहातून आत्महत्त्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. (Nashik Police Inspector Ambad Police Station shot himself marathi news)

अशोक निवृत्ती नजन (४७, रा. इंदिरानगर, नाशिक. मूळ रा. वैजापूर, जि. औरंगाबाद) असे मयत पोलीस निरीक्षकांचे नाव आहे. मंगळवारी (ता. २०) रात्री उशिरा त्यांच्यावर मूळगावी वैजापूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, वर्षभरापूर्वी अंबड पोलीस ठाण्यात रुजू झालेले पोलीस निरीक्षक अशोक नजन यांनी सोमवारी (ता. १९) शिवजयंतीनिमित्ताने मंगळवारी (ता.२०) पहाटेपर्यंत सिडको परिसरात बंदोबस्त केला. पहाटेच्या सुमारास ते घरी गेले. त्यानंतर ते सकाळी सव्वा नऊ-साडेनऊच्या सुमारास अंबड पोलीस ठाण्यात आले.

त्यावेळी त्यांनी पोलीस ठाण्यातील अंमलदारांना फॉलिंगचा आदेश दिला. त्यानुसार ठाण्यातील सारे अंमलदार हे आवारात फॉलिंगसाठी उभे राहिले. त्यानंतर नजन हे पुन्हा आतमध्ये त्यांच्या कॅबिनकडे गेले. काही मिनिटांनी काही पडल्याचा आवाज आला.

त्यानंतर अंमलदार शरद झोले हे आतमध्ये पाहण्यासाठी गेले, त्यावेळी नजन यांनी स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून डोक्याच्या उजव्या बाजुला कानाजवळ गोळी मारून घेतली होती व ते त्यांच्या खुर्चीवर निपचित होते. खुर्चीजवळ रक्ताचे थारोळे साचले होते. या घटनेने साऱ्या पोलीस अंमलदारांना धक्का बसला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्यासह आयुक्तालयातील पोलीस अधिकाऱ्यांनी अंबड पोलिस ठाण्यात धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून नजन यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. याप्रकरणी अंबड पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

९७ व्या तुकडीचे उपनिरीक्षक

अशोक नजन हे सत्र-९७ व्या तुकडीचे प्रशिक्षणार्थी होते. २००५ मध्ये ते उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाले. २०१९ मध्ये ते पोलीस निरीक्षक झाले होते. जून २०२३ मध्ये त्यांची नाशिक पोलीस आयुक्तालयात बदली झाली. त्यानंतर त्यांची अंबड पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली होती.

तेव्हापासून गुन्हे शोध पथकाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. अतिशय दमदार कामगिरी आणि हसतमुख व्यक्तीमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. मूळचे वैजापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील रहिवाशी असलेले नजन यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा आहे. मुलगा अकरावीच्या वर्गात शिकतो.

गोळी डोक्यातून आरपार

पोलीस निरीक्षक नजन यांनी कानशिलावर रिव्हॉल्व्हर ठेवून टिगर दाबला. त्यामुळे गोळी डाव्या बाजुने निघून भिंतीलगतच्या कपाटाला लागून पुन्हा विरुद्ध बाजुच्या भिंतीला आदळून जमिनीवर पडलेली आढळून आल्याचे पंचनाम्यात नमूद आहे.

त्यांच्याजवळ सुसाईड नोट आढळून आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या आत्महत्त्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र कौटुंबिक कारणातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे अशी शक्यता व्यक्त होते आहे.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *