कुठे दागिन्यांची चोरी, तर कुठे रोख रकमेची चोरी, कुठे घरातून तर कुठे बँकांमधूनही चोऱ्या होतात; पण अलीकडेच एक अशी चोरी झाली, की त्याबद्दल ऐकून तुम्हीसुद्धा चक्रावून जाणार आहात.
अमेरिकेमध्ये एका रेडिओ टॉवरवर आतापर्यंतची सगळ्यात विचित्र चोरी झाली आहे. या घटनेत चोरांनी 200 फूट उंचीचा टॉवर चोरला आहे. जेव्हा पोलिसांना या चोरीबद्दल समजलं तेव्हा पोलिससुद्धा पूर्णपणे चक्रावून गेले होते.
अमेरिकेच्या अलाबामा राज्यात जॅसपर नावाचं एक शहर आहे. तिथं एक छोटं रेडिओ केंद्र आहे. WJLX असं या रेडिओ स्टेशनचं नाव आहे. या रेडिओ स्टेशनच्या अधिकृत फेसबुक पेजवर एक पोस्ट 3 फेब्रुवारी रोजी शेअर करण्यात आली आहे. या पेजवर महिन्याच्या सुरुवातीलाच एक आश्चर्यकारक घटना सांगण्यात आली आहे. स्टेशनचे प्रमुख ब्रेट एलमोर यांनी लिहिलं आहे, की त्यांच्या रेडिओ स्टेशनच्या आवारात चोरी होत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं; पण त्यांना असं वाटलं नव्हतं की चोर कोणत्याही गोष्टीची चोरी करतील. या पोस्टमध्ये पुढे म्हटलं आहे, की सकाळी त्यांच्या रेडिओ स्टेशनचे कर्मचारी टॉवरच्या परिसरात स्वच्छता करण्यासाठी गेले होते.
टॉवर चोरला
काही अंतरावर टॉवर बसवण्यात आला होता. जेव्हा ते कर्मचारी त्या जागेवर पोहोचले तेव्हा त्यांना धक्काच बसला. कार्यालयात जबरदस्तीने घुसखोरी करण्यात आल्याचं दिसत होतं. तिथलं सामान अस्ताव्यस्त पसरलं होतं आणि संपूर्ण टॉवरच गायब झाला होता. तो टॉवर 200 फूट उंच होता. ब्रेट यांनी म्हटलं आहे, की ते चोर अक्षरशः इथला संपूर्ण टॉवरच उपटून घेऊन पसार झाले आहेत. ब्रेट यांना जेव्हा या चोरीबद्दल सांगण्यात आलं तेव्हा त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांकडे नक्की टॉवरच्या चोरीबद्दलच सांगत आहात का, हे पुन्हा पुन्हा विचारून खात्री करून घेतली. कारण टॉवर चोरी होणं, या गोष्टीवर विश्वास ठेवणं फारच अवघड होतं.
कोट्यवधींचं नुकसान
ब्रेट म्हणाले, की जेव्हा पोलिसांना या बाबतीत सांगण्यात आलं तेव्हा त्यांनाही याचा धक्का बसला. चोरांनी फक्त टॉवरच नाही तर ट्रान्समीटरसुद्धा चोरला आहे. दोन्ही कमीत कमी 50 लाख रुपये किमतीचे आहेत. या दोन्हीची किंमत, ते बसवण्याचा खर्च आणि अन्य साहित्याचा खर्च मिळून एक कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च असू शकतो. पोलिसांचं पथक आता तपासात गुंतलं आहे. आता मदतीसाठी लोकही पुढे येत आहेत. त्यामुळं त्यांनी आता एक गो फंड मी कॅम्पेन सुरू केली आहे. आता या माध्यमातून ते टॉवरसाठी पुन्हा निधी जमा करत आहेत.