वृत्तसंस्था : भारत, रशिया आणि चीनमध्ये प्राचीन काळापासून सांस्कृतिक नाते आहे. जागतिक महासत्ता ही संकल्पनाही या तीन देशांभोवती फिरत आलेली आहे. आशियातील हे तीन देश म्हणजे जगाचे त्रिदेव आहेत, असे मत रशियन परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी रशियात होऊ घातलेल्या ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग ही त्रिमूर्ती गेली काही वर्षे एकत्रित भेटलेली नाही. या तिघांच्या मॉस्कोतील भेटीकडे जग मोठ्या आशेने बघते आहे, असेही लावरोव्ह म्हणाले.
‘मोदी-पुतीन-जिनपिंग भेटीकडे जगाचे लक्ष’
‘जागतिक महासत्ता सरकते आहे आशियाकडे’
‘यंदा 4 नवे देश ब्रिक्समध्ये सहभागी होणार’
1990 पासून सुरुवात; संघटनेत 3 देश ते 8 देश
रशिया-भारत-चीन या त्रिमूर्तींनी 1990 च्या दशकातच एकत्रित बैठकांना सुरुवात केली होती. पुढे हे त्रिकूट विस्तारले आणि ब्रिक्स बनले. ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका त्यात सामील झाले.
चालू वर्षात 1 जानेवारी रोजी, चार नवीन सदस्य इजिप्त, इथिओपिया, इराण आणि यूएईचाही (संयुक्त अरब अमिरात) त्यात अंतर्भाव झालेला आहे, असे लावरोव्ह यांनी स्पष्ट केले.
ब्रिक्स त्रिसूत्री…
1. ब्रिक्स पाश्चिमात्य देशांच्या विरोधात नाही
2. जागतिक अर्थव्यवस्थेतील बदलांचे ब्रिक्स हे प्रतीक
3. ब्रिक्स एक अशी संघटना, ज्यात कोणताही देश मोठा वा छोटा नाही
ब्रिक ते ब्रिक्स
* चारही देशांच्या आद्याक्षरांनी मिळून ब्रिक हा शब्द ओनील यांनी बनवला होता.
* बी फॉर ब्राझील, आर फॉर रशिया, आय फॉर इंडिया आणि सी फॉर चीन. ब्रिकचा अर्थ वीट.
* नंतर साऊथ आफ्रिकाही सदस्य बनल्याने तो ब्रिक्स असा परिवर्तित झाला.
ब्रिक्सची सद्यस्थिती
* ब्रिक्स ही युरोपियन युनियनला मागे टाकून जी-7 आणि जी-20 पाठोपाठ जगातील तिसरी सर्वात शक्तिशाली आर्थिक संघटना बनली आहे.
ब्रिक्सचा प्रवास
2000 : च्या दशकात ब्राझील, रशिया, भारत आणि चीन हे देश वेगाने प्रगतिपथावर निघालेले होते. या एकत्रित प्रगतीला ब्रिक म्हटले गेले.
2001 : गोल्डमॅन सॅक या गुंतवणूक बँकेमध्ये कार्यरत असताना अर्थतज्ज्ञ जिम ओनील यांनी या चारही देशांसाठी मिळून ब्रिक (मराठीत वीट) या शब्दाची योजना केली.
2009 : या वर्षात ब्राझील, रशिया, चीन आणि भारताने (इंडिया) मिळून आपली एक संघटना बनवली आणि तिला ब्रिक हे नाव दिले.
2010 : ब्रिक संघटनेत दक्षिण आफ्रिकाही सहभागी झाला. या देशाचे आद्याक्षर एस (साऊथ आफ्रिका) म्हणून संघटनेचे नाव बनले ब्रिक्स!