इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या हैफा येथील सीझेरिया येथी निवासस्थानाजवळ शनिवारी ड्रोनचा स्फोट झाला. यानंतर आता इस्रायलने लेबनॉन आणि गाझावरील हवाई हल्ले तीव्र केले आहेत.
इस्रायलने शनिवारी अनेक घरे आणि बहुमजली निवासी इमारतींवर केलेल्या हवाई हल्ले सुरू केल्यानंतर डॉक्टरांसह सुमारे ७३ लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा दहशतवादी संघटना हमासने केला आहे.
दोन आठवड्यांत गाझाच्या उत्तर भागात ४०० जण ठार
शनिवारी उत्तर गाझामधील बीट लाहिया शहरातील अनेक घरे आणि बहुमजली निवासी इमारतीवर हवाई हल्ला करून नेतन्याहू यांच्या हत्येच्या प्रयत्नाला इस्रायलने प्रत्युत्तर दिले. या हल्ल्यात डॉक्टरांसह किमान ७३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हमासच्या माध्यमांनी दिली आहे. तथापि, इस्रायलने मृतांचा आकडा हा अतिशयोक्तीपूर्ण असल्याचे म्हटलं आहे. आमचा हल्ला अचूक होता आणि हमास नष्ट करणे हाच आमचा उद्देश होता, असाही पुन्नरुच्चार केला आहे. दरम्यान, झाच्या नागरी संरक्षण एजन्सीने म्हटलं आहे की, इस्त्रायली लष्करी कारवाईत दोन आठवड्यांत गाझाच्या उत्तर भागात 400 हून अधिक लोक मारले गेले आहेत.
गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत ४२ हजारांहून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत, स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यातीलन निम्म्याहून अधिक महिला आणि मुले आहेत. इस्रायलने लेबनॉनच्या काही भागांतील लोकांना इमारती आणि गावे सोडून जाण्यासाठी जवळपास दैनंदिन चेतावणी जारी केली आहे. या लढाईमुळे सुमारे चारलाखांहून अधिक अधिक लोक विस्थापित झाले आहेत. ऑक्टोबर 2023 पासून लेबनॉनमध्ये 2,400 हून अधिक लोक मारले गेले आहेत.