देश-विदेश

आता युद्ध थांबवणार नाही!; २१ दिवसांच्या युद्धबंदीचे अमेरिकेसह मित्रदेशांचे आवाहन इस्रायलने फेटाळले


इस्रायल-हिजबुल्लाह यांच्यात वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका, फ्रान्ससह इतर मित्रदेशांनी या युद्धातील दोन्ही गटांनी तातडीने २१ दिवसांच्या युद्धबंदीची घोषणा करावी, असे आवाहन केले आहे.

 

याचदरम्यान, इस्रायलने लेबनॉनमध्ये सैनिक घुसवून हल्ला करण्याची धमकी दिली आहे.

लेबनॉनमध्ये अशात झालेल्या इस्रायली हल्ल्यांत किमान ६०० लोक मारले गेले असून, या पार्श्वभूमीवर अमेरिका-फ्रान्ससह मित्रदेशांनी युद्धबंदीचे हे आवाहन केले आहे. मात्र हे आवाहन फेटाळून इस्रायलने लेबनॉनसोबतचे युद्ध थांबविण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता संयम ठेवला नाही तर आगामी काळात हे युद्ध भयंकर रूप धारण करू शकते, अशी भीती आता जगभरात व्यक्त करण्यात येत आहे.

 

लेबनॉन प्रवास टाळा : भारताने केले आवाहन

जेरुसलेम : इस्रायल-लेबनॉन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी लेबनॉनचा प्रवास टाळावा, असे आवाहन केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच, लेबनॉनमध्ये असलेल्या भारतीयांनी सुरक्षिततेची काळजी घेत लवकरात लवकर हा देश सोडण्याचा प्रयत्न करावा, असा सल्लाही तेथील भारतीयांना देण्यात आला आहे.

हिजबुल्लाहचा इस्रायलवर हल्ला आणि इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांनंतर तेथील २० हजार लोक विस्थापित झाले आहेत.

 

सिरीयाचे कामगार ठार

इस्रायलने एका इमारतीवरील हल्ल्यात सिरियातील २३ कामगारांचा मृत्यू झाल्याचा दावा लेबनॉनने केला.

आण्विक धोरणात बदल करू : रशियाचा इशारा

आण्विक शक्ती नसलेल्या युक्रेनसारख्या देशाकडून अण्वस्त्रसज्ज देशांच्या पाठिंब्याने रशियावर होणारा हल्ला ‘संयुक्त हल्ला’ मानला जाईल.

एकप्रकारे रशिया याला युक्रेन युद्धात अण्वस्त्रांच्या वापराचा धोका मानेल, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पूतिन यांनी दिला.

 

अण्वस्त्रांचा वापर करावयाचा याबाबतच्या नियमात बदल करण्याविषयी सरकार विचार करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *