नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे.सर्वात आधी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यानंतर राजनाथ सिंह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर तिसऱ्या क्रमांकावर अमित शाह यांनी शपथ घेतली.
महाराष्ट्रातील बडे नेते नितीन गडकरी यांनी चौथ्या क्रमांकावर मंत्रिपदाची शपथ घेतली. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातील सर्वात मोठा सोहळा पार पडतो आहे. या कार्यक्रमाकडे जगाचं लक्ष आहे. या कार्यक्रमाला 7000 लोकांना निमंत्रण देण्यात आलं आहे. जगभरातील दिग्गज लोक उपस्थित आहेत.
नितीन गडकरी कोण आहेत?
नितीन गडकरी हे तीनवेळा नागपूरमधून निवडून आलेले आहेत. 2014, 2019 या मोदी सरकारमध्ये मंत्री होते. गडकरी हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील राहिलेले आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रिपद नितीन गडकरी यांनी सांभाळलेलं आहे. ‘रोडकरी’ अशी नितीन गडकरी यांची ओळख आहे. देशातील रस्त्यांचं जाळ विस्तारण्यात नितीन गडकरी यांचा मोठा वाटा राहिला आहे. बई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते नितीन गडकरी यांच्या मंत्रिपदाच्या काळात झालेले आहेत.
ठिकठिकाणी जल्लोष
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्र्यांच्या शपथ विधी सुरू होताच नितीन गडकरींच्या नागपुरात जल्लोष केला गेला. चौकात मोठा स्क्रीन लावून शपथविधी कार्यक्रम पहिला जात आहे. कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी गर्दी केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या निमित्ताने ठिकठिकाणी भाजपकडून जल्लोष केला जात आहे. रत्नागिरीत ढोल ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा होतोय. नरेंद्र मोदी यांचा शपथविधी पाहण्यासाठी शहरातील मारुती मंदिर परिसरात एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. मोठ्या संख्येने रत्नागिरी जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी जल्लोषात सामील झाले आहेत.
नाशिकच्या भाजपा कार्यालयात नरेंद्र मोदींच्या शपतविधीचा जल्लोष पाहायला मिळतोय. गुलालाची उधळण करत डिजेच्या तालावर नाचून जल्लोष साजरा केला जातोय. भाजप कार्यालयात एल ई डी स्क्रीन द्वारे शपथविधी सोहळा पाहिला जात आहे. भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयात बसून एल ई डी स्क्रिनच्या माध्यमातून शपथविधी सोहळा पाहिला जात आहे.