देश-विदेश

रशियात अध्यक्षपदाच्या निवडीसाठी शुक्रवारपासून मतदानाला सुरुवात, व्लादिमीर पुतीन यांचा एकतर्फी विजय निश्‍चित


रशियात अध्यक्षपदाच्या निवडीसाठी शुक्रवारपासून मतदानाला सुरुवात झाली. ही मतदान प्रक्रिया तीन दिवस म्हणजे रविवारपर्यंत (ता.१७) चालणार आहे. सक्षम स्पर्धक नसल्याने या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (वय ७१) यांचा एकतर्फी विजय निश्‍चित असल्याचे मानले जात आहे.

युक्रेन युद्ध, विरोधकांवर मात , प्रसारमाध्यमे व उजव्या विचारसरणीच्या गटांची मुस्कटदाबी आणि पुतीन यांचे राजकीय व्यवस्थेवर पूर्ण नियंत्रण या पार्श्वभूमीवर नव्या अध्यक्षांच्या निवडीसाठी संपूर्ण रशियातील नागरिक मतदानात सहभागी होत आहेत. युक्रेनमधील ज्या प्रदेशांवर रशियाने ताबा मिळविला आहे, तेथेही मतदान घेण्यात येत आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रथमच ऑनलाइन मतदानाचा पर्याय देण्यात आला आहे. मतदानाला आज सुरुवात झाल्यानंतर मॉस्कोमधील काही वेळातच दोन लाखांहून अधिक नागरिकांनी ऑनलाइन मतदान केले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुतीन यांच्यासमोर आव्हानच नसल्याने ते आणखी सहा वर्षे रशियाचे अध्यक्ष असतील, असे मानले जात आहे. अध्यक्षपदाचा त्यांचा हा पाचवा कार्यकाळ असेल. पुतीन यांचे राजकीय विरोधक एक तर तुरुंगात आहेत किंवा परदेशात अज्ञातस्थळी आहेत. त्यांचे कट्टर विरोधक ॲलेक्सी नवाल्नी यांचा गेल्या महिन्यात गूढ मृत्यू झाला. निवडणुकीतील अन्य तीन उमेदवार हे पुतीन यांच्या तुलनेत कमकुवत आहेत.

खरे निरीक्षण करणे कठीण

पुतीन यांची रशियावरील पकड पाहता आणि मतदारांपुढे उमेदवारांचे पर्यायही नसल्याने ही निवडणूक मुक्त आणि निष्पक्ष होईल, अशी अपेक्षा निरीक्षकांना नाही. देशातील सुमारे एक लाख मतदान केंद्रांवर तीन दिवसांहून अधिक काळ मतदान सुरू असेल. मात्र याचे वास्तव निरीक्षण करणे कठीण आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *