बीड : पती पत्नीचं नातं हे विश्वास आणि प्रेमावर टिकून असतं. दोघांच्यातील कोणीही एकमेकांपासून काही लपवलं किंवा खोटं बोललं की या नात्यात दुरावा येण्यास सुरूवात होते. मात्र, तरीही लोक अशा काही चुका करतात, ज्या नंतर त्यांनाच महागात पडतात.
बीडमधून सध्या एक असंच प्रकरण समोर आलं आहे. लग्नानंतर एका विवाहितेला समजलं की तिचा पती नपुंसक आहे. यानंतर तिने पोलिसांत धाव घेतली.
आपला पती नपुंसक असल्याचं लक्षात येताच ती याबाबत आपल्या सासू सासऱ्यांसोबत बोलली. मात्र, त्यांनी तिलाच त्रास देण्यास सुरूवात केली. सासरी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू झाला. या त्रासाला कंटाळून शेवटी या महिलेनं पती, सासू, सासरे, नणंद आणि दिराविरोधात पोलिसात धाव घेतली. तिने या सर्वांविरोधात माजलगाव शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
महिलेच्या तक्रारीनंतर तिच्या पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणातील पाटोदा येथील एका मुलाचं लग्न माजलगावमधील एका मुलीसोबत एप्रिल 2022 मध्ये करण्यात आलं होतं. यानंतर काही काळातच पती नपुंसक असल्याचं तिच्या लक्षात आलं. तिने याबाबत सासू सासरे आणि नणंदेला सांगितलं. मात्र, यानंतर सासरच्या मंडळींनी तिलाच टोमणे मारायला आणि छळ करायला सुरुवात केली.
त्यांनी तिचा छळ करत तिला जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या. सासरकडच्या इतर लोकांसह पतीनेही तिला त्रास दिला. शेवटी या सगळ्या त्रासाला कंटाळून तिने पोलिसांकडे मदत मागितली. विवाहितेनं याप्रकरणी सासरच्या सहा जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलीस .या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.