प्रीतम मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी पाथर्डी मतदारसंघ निवडणार का? पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
राज्याच्या राजकारणात सध्या लोकसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरू आहे. एकीकडे लोकसभेच्या प्रचारांचा धडाका सुरू असतानाच विधानसभेचीही मोर्चबांधणी सुरू आहे. अशातच बीडमधून प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापून पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर त्यांच्या पुनर्वसनाच्या हालचाली सुरू झाल्याचे बोलले जात आहे.
प्रीतम मुंडे यांनी शेवगाव- पाथर्डी मतदार संघातून आमदारकी लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रीतम मुंडेंच्या पुनर्वसनाच्या हालचाली?
पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी मिळाल्यामुळे प्रीतम मुंडे यांचे पुनर्वसन कुठे करणार याची चर्चा आता सुरू झाली आहे. परळीमध्ये धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे निवडून आले असल्यामुळे ती जागा धनंजय मुंडे सोडणार नाहीत. पंकजा मुंडे दिल्लीत धनंजय मुंडे परळीत तर प्रीतम मुंडे यांचे काय होणार? असा प्रश्न असतानाच अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघातून प्रीतम मुंडे यांना आमदारकीची उमेदवारी द्यावी अशी मागणी आता पाथर्डी मधून जोर धरू लागली आहे.
पाथर्डीमधून आमदारकी लढणार?
पंकजा मुंडे नेहमीच म्हणत असतात परळी माझी आई आहे तर पाथर्डी माझी मावशी आहे. त्यामुळे पाथर्डी मतदारसंघातून गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे या मतदारसंघात प्रीतम मुंडे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी आता भाजपच्या प्रदेश सचिव असलेले अरुण मुंडे आणि ओबीसी सेलचे अध्यक्ष गोकुळ दौंड यांनी केली आहे.
पंकजा मुंडेंचे सूचक विधान!
दरम्यान, पंकजा मुंडे यांनाही प्रीतम मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी पाथर्डी मतदारसंघ निवडणार का? असा प्रश्न केल्यावर त्यांनी याबाबत सूचक उत्तर दिले आहे. पाथर्डीचे आमदार माझ्या शेजारी आहेत, त्यांचे उगाच टेन्शन वाढवू नका, आम्ही कोणत्याही प्रकारे ग्रस्त नाहीत आम्ही संघर्ष करणारे आहोत असे सूचक विधान पंकजा मुंडे यांनी केले आहे.