अमेरिकादेश-विदेश

जगातील आनंदी देशांची यादी प्रसिद्ध, पहिल्यांदाच अमिरेका आणि जर्मनी हे पहिल्या २० देशांमध्ये नाहीत.


जगातील प्रत्येक व्यक्तीला आनंदी राहावं असं वाटत असतं. पण, देशातील परिस्थितीनुसार त्यांच्या आनंदामध्ये फरक पडत असतो. जगातील आनंदी देशांची यादी प्रसिद्ध झाली आहे.

युनायटेड नेशन्सच्या वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट ( World Happiness Report ) बुधवारी जाहीर झाला आहे.

जगातील सर्वाधिक आनंदी देशांमध्ये फिनलँडने सलग सातव्यांदा अव्वल स्थान मिळवलं आहे. नॉर्डिक देशांनी नेहमीप्रमाणे पहिल्या दहा उत्साही देशांमध्ये स्थान मिळवलं आहे. फिनलँडनंतर डेन्मार्क, आईसलँड, स्विडन या देशांचा क्रमांक लागतो.

भारताचा क्रमांक कितवा?

भारताने मागील वर्षाप्रमाणे १२६ वा क्रमांक कायम ठेवला आहे. दुसरीकडे, २०२० मध्ये तालिबानने ताब्यात घेतलेला अफगाणिस्तान या यादीमध्ये सर्वात शेवटच्या म्हणजे १४३ व्या स्थानी आहे. अफगाणिस्तानमधील परिस्थिती आणि लोकांची दयनीय अवस्था यावरुन अफगाणिस्तानला यादीमध्ये सर्वात शेवटी ठेवण्यात आलं आहे.

विशेष म्हणजे रिपोर्ट प्रसिद्ध होत असल्यापासून पहिल्यांदाच अमिरेका आणि जर्मनी हे पहिल्या २० देशांमध्ये नाहीत. या यादीमध्ये अमेरिकेचा २३ वा तर जर्मनीचा २४ वा क्रमांक आहे. याउलट, कोस्टा रिका, कुवैत या दैशांनी पहिल्या २० देशांमध्ये स्थान मिळवलं आहे. या देशांचा अनुक्रमे १२ आणि १४ वा क्रमांक आहे. रिपोर्टमधून दिसतंय की, आनंदी देशांच्या यादीमध्ये मोठ्या देशांची पिछाडी झाली आहे.

पहिल्या दहा देशांमध्ये नेदरलँड आणि ऑस्ट्रेलिया हे दोनच देश आहेत ज्यांची लोकसंख्या दीड कोटींपेक्षा जास्त आहे. पहिल्या २० देशांमध्ये कॅनडा आणि यूके हे दोन देश आहेत ज्यांची लोकसंख्या तीन कोटीपेक्षा अधिक आहे.अफगाणिस्तान, लेबनॉन, जॉर्डन या देशांची तीव्रतेने घसरण झाली आहे, तर पूर्व यूरोपीयन देश सर्बिया, बुलगेरिया आणि लटाविया या देशांनी सुधारणा दाखवली आहे.

आनंदी देश कसा ठरवला जातो?

हॅपीनेस रिपोर्ट ठरवताना लोकांची मतं जाणून घेतली जातात. लोक त्यांच्या आयुष्याबाबत किती समाधानी आहेत, देशाचा दरडोई किती जीडीपी आहे, सामाजिक आधार किती मिळतो, आरोग्य , लोकांचे आयुर्मान, स्वातंत्र्य, भ्रष्टाचार, औदार्य या गोष्टी आनंदी देश ठरवताना गृहित धरल्या जातात.

निसर्गाशी जवळचा संबंध आणि निरोगी वर्क-लाईफ बॅलेन्स हे समाधानी आयुष्याचे गमक आहे, असं फिनलँडमधील हेलसिन्कीमधील हॅपीनेस रिसर्चर जेनिफर डी पाओले म्हणाले. सरकारवरील लोकांचा विश्वास, भ्रष्टाचाराचे कमी प्रमाण, शिक्षण, सार्वजनिक सुविधा, तसेच पैशांपेक्षा समाधानी जीवन या गोष्टी आनंदी जिवनासाठी महत्त्वाच्या आहेत असंही त्या म्हणाल्या.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *