अकोला

एक क्विंटल कापसात तीन ग्रॅम सोनं


अकोला : गेल्या काही दशकांपासून झालेली कापसाची उतरंडी यावर्षी थांबली अन् प्रतिक्विंटल दहा हजाराहून अधिक भाव अकोल्यात कापसाला मिळाला. मात्र, एक क्विंटल कापसात तीन ग्रॅम सोनं मिळेल, अशा भाववाढीची अपेक्षा बाळगून शेतकरी अजूनही कापूस साठवणूकीवर भर देत असल्याचे चित्र अकोल्यासह वऱ्हाडात पाहायला मिळत आहे.महाराष्ट्रात पाच दशकापूर्वी म्हणजे १९७२ च्या आसपास एक तोळा (दहा ग्रॅम) सोन्याचा भाव २५० ते ३०० रुपये होता व कापसाचा भाव २५० रुपये प्रतिक्विंटल होता; म्हणजेच एक क्विंटल कापूस विकून दहा ग्रॅम सोनं विकत घेता येत होतं.त्यामुळेच कापसाला पांढर सोनं म्हटले जात होतं.

मात्र, त्यानंतर दिवसेंदिवस सोन्याला झळाळी येऊ लागली अन् उत्पादन खर्च वाढीसोबतच भाव घसरण झाल्याने कापसाची चकाकी कमी झाली. दोनवर्षांपूर्वी सुद्धा कापसाला प्रतिक्विंटल तीन ते चार हजार रुपये भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागत होता. परंतु, गेल्या चार-पाच वर्षात देशांतर्गत तसेच देशाबाहेर घटलेले कापूस उत्पादन व वाढलेल्या कापड उद्योगामुळे कापसाच्या मागणीत, पर्यायाने भावात सुद्धा काही प्रमाणात वाढ होत गेली. केंद्र सरकारने सुद्धा सन २०२१-२२ करीता कापसाला ५७२६ व ६०२५ रुपये किमान आधारभूत किंमत जाहीर केली. शिवाय अमेरिका, चिन, ब्राझिल, बांगलादेश इत्यादी कापूस उत्पादक देशांमध्ये कापूस उत्पादन घटल्याने मागणी वाढली. देशांतर्गत सुद्धा पंश्‍चिम बंगाल, गुजरात व इतर कापड उद्योगासाठी प्रसिद्ध राज्यामधून कापूस मागणी वाढली. त्यामुळे यावर्षी कापसाला बाजारात प्रतिक्विंटल दहा हजाराहून अधिक भाव सध्या मिळत आहे. परंतु, अजूनही भाववाढ शक्य असून, पुढील काही दिवसात १५ ते १६ हजार रुपयांपर्यंत भाव जाण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस साठवूण ठेवला असून, बाजारातील आवक मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे चित्र आहे.

सध्या कापसाला प्रतिक्विंटल ९८०० ते १०२५० रुपयापर्यंत भाव मिळत आहे. मात्र, तरीसुद्धा शेतकरी कापूस विक्रीसाठी आणायला तयार नाहीत. शेतकऱ्यांसोबत याबाबत चर्चा केली असता, अनेकांनी १५ ते १६ हजार रुपयांपर्यंत भाववाढीची अपेक्षा बाळगल्याचे लक्षात आले आहे. मात्र, उत्पादन व मागणीचे स्वरुप लक्षात घेता ११ ते १२ हजार रुपयांपर्यंत भाव जाण्याची शक्यता आहे.

– आर.एम. डहाके, निवृत्त विभागीय व्यवस्थापक, कापूस पणन महासंघ अकोला

सध्या कापसाला प्रतिक्विंटल १०५०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. परंतु, अजून भाववाढीची शक्यता पाहाता १०० क्विंटल कापूस विकायचा बाकी ठेवला आहे. काही प्रमाणात भाव वाढल्यास ठेवलेला कापसाची विक्री करू. एकंदरीत कापूस उत्पादन व मागणी लक्षात घेता अजून दीड ते दोन हजार रुपयांची भाव वाढ अपेक्षीत आहे.

– चेतन गावंडे, कापूस उत्पादक शेतकरी, सांगवामेळ


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *