Russia Ukraine war : “भारत मध्यस्थी करणार असेल तर…”, रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांचं वक्तव्य !
सध्या सुरू असलेल्या युक्रेन रशिया युद्धामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचं पहायला मिळतंय. दोन्ही देश विनाशाच्या दिशेने जात असतानाच आता एक सुखद बातमी समोर आली आहे.
रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करतोय. गेल्या काही महिन्यांत पंतप्रधान मोदींनी रशिया आणि युक्रेनचा दौरा केला होता. अशातच पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला यश मिळत असल्याचं चित्र समोर येत आहे. मोदींच्या दौऱ्यानंतर रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी मोठं वक्तव्य केलंय.
काय म्हणाले ब्लादिमीर पुतीन?
युक्रेनवरील संभाव्य शांतता चर्चेत चीन, भारत आणि ब्राझील मध्यस्थाची भूमिका बजावू शकतात, असं ब्लादिमीर पुतीन यांनी म्हटलंय. इस्तंबूलमधील चर्चेत युद्धाच्या पहिल्या आठवड्यात रशियन आणि युक्रेनियन वार्ताकारांमध्ये झालेला प्राथमिक करार, जो कधीही अंमलात आला नाही, तो चर्चेचा आधार म्हणून काम करू शकेल, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये बोलताना पुतिन यांनी हे वक्तव्य केलंय. रशियाचे पहिलं उद्दिष्ट युक्रेनच्या डॉनबास प्रदेशाला जोडलं जाणं हेच असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय.
गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर त्यांनी युक्रेनला देखील भेट दिली होती. त्यामुळे भारत युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करत असल्याचं स्पष्ट झालं होतं. अशातच आता पुतीन यांनी थेट भारतावर विश्वास दाखवल्याने जगात भारताची प्रतिमा उंचावत असल्याचं दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक आणि उच्चशिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी यावर मत व्यक्त केलं आहे.
‘जर भारत मध्यस्थी करणार असेल तर युक्रेन बरोबर शांतता चर्चा करायला रशिया तयार असल्याचं रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी म्हटलंय. त्यामुळे रशिया युक्रेन शांतता चर्चेची दुसरी फेरी भारतात होण्याची शक्यता आहे. पहिल्यांदाच एखादा युरोपियन संघर्ष सोडविण्यासाठी भारताला मध्यस्थी करायला सांगितले जातेय ही अतिशय अभिमानाची बाब असल्याचं डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी म्हटलं आहे. यातून भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाची प्रचिती येते’, असंही देवळाणकर यांनी म्हटलंय.