क्राईम

आधी सामूहिक बलात्कार, नंतर कापली जीभ.. मालकिणीचे नोकराणीवर अमानुष अत्याचार


धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिण दिल्लीतील गोविंदपुरी भागात एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने तिच्या घरी काम करणाऱ्या युवतीवर तिच्या काही मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

इतकंच नाही तर आरोपीने घटनेनंतर पीडितेची जीभही कापली जेणेकरून तिने कोणाला काही सांगू नये.

या घटनेतील आणखी एक लाजिरवाणी बाब म्हणजे पोलिसांनीही पीडितेची तक्रार ऐकून घेतली नाही. दोन वर्षांच्या संघर्षानंतर सोमवारी साकेत न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पीडित युवती बदरपूर भागात राहते आणि गोविंदपुरी येथील एका घरात काम करते. पीडित युवतीची मालकीण मसाज सेंटर चालवते. 29 डिसेंबर 2022 रोजी महिलेने तिला तिच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त काही लोकांसाठी जेवण बनवण्यासाठी तिला बोलावले होते.

रात्री 8-9 च्या सुमारास चार-पाच जण घरात आले होते. यातील एकाने तिला पाणी मागताना दोन वेळा तिचा हात धरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मालकिणीने युवतीला थंड पेय पिण्यासाठी दिले. यानंतर ती बेशुद्ध झाली. दोन दिवसांनी शुद्धीवर आल्यावर तिला गुरुग्राममधील एका खाजगी रुग्णालयात दाखल केल्याचे दिसून आले. तिच्या तोंडाला, डोळ्यावर, डोक्याला आणि कपाळावर गंभीर जखमा झाल्या होत्या. तिची जीभही कापली होती आणि तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सूज आली होती तर ती वेदनांनी ओरडत होती.

या घटनेनंतर समजले की, तिच्या मालकिणीने नाव बदलून तिला रुग्णालयात दाखल केले होते. तिच्या कुटुंबीयांनाही याबाबत माहिती देण्यात आलेली नव्हती. या मुलीने हॉस्पिटलमधून पळून आपला जीव वाचवला आणि कुटुंबियांना घटनेची माहिती दिली.

आरोपींनी दिली जीवे मारण्याची धमकी

आरोपींनी कट रचून सामूहिक बलात्काराची घटना घडवून आणल्याचा आरोप पीडितेने केला आहे. कोणाला काही सांगू नये म्हणून आरोपींनी तिला बेदम मारहाण केली आणि तिची जीभ कापली आणि तिला जीवे मारण्याची धमकीही दिली.

न्यायालयाने पोलिसांचा निष्काळजीपणा केला मान्य

पीडितेने स्थानिक पोलिस स्टेशन आणि दक्षिण-पूर्व दिल्ली जिल्हा पोलिसांच्या उच्च अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. पोलिस ठाण्यात सातत्याने तक्रार करूनही गुन्हा दाखल झाला नाही. यानंतर पीडितेने न्यायालयात धाव घेत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी घेतल्यानंतर साकेत न्यायालयाने या प्रकरणातील पोलिसांचा निष्काळजीपणा मान्य करत पीडितेच्या तक्रारीवरून स्थानिक एसएचओला गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *