महाराष्ट्रातील ‘या’ 7 जिल्ह्यांमध्ये तुफान गारपीटीची शक्यता ! गारपीट अन अवकाळीच संकट किती दिवस राहणार ?
महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात कांदा काढणी सुरू आहे. दुसरीकडे विदर्भात आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये हळद काढणी सुरु आहे. तसेच राज्यातील विविध भागांमध्ये गहू, हरभरा अशा विविध रब्बी पिकांची हार्वेस्टिंग प्रगतीपथावर आहे.
काही शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग पूर्ण झाली आहे. मात्र, काही शेतकऱ्यांची हार्वेस्टिंगची कामे अजून बाकी आहेत. पण काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाचे सत्र सुरू झाले आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. पण, या वादळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
अशातच, हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुफान गारपीटीची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे शेतकरी बांधव मोठ्या चिंतेत आले असून शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान आता आपण भारतीय हवामान खात्याने राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये अवकाळीची अन गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे ? याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कुठे बरसणार वादळी पाऊस अन कुठे होणार गारपीट ?
हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे 10 एप्रिलला राज्यातील पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होणार असे देखील आयएमडीने स्पष्ट केले आहे.
अकोला, वाशीम आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांत तुफान गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली असून आय एम डी ने रेड अलर्ट जारी केला आहे. शिवाय बुलढाणा, अमरावती, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यात देखील काही ठिकाणी गारपीट होणार असे आयएमडीने म्हटले आहे.
याशिवाय पुणे, अहमदनगर, सांगली, सोलापूर, जळगाव या जिल्ह्यांमध्ये, विदर्भातील बाकीच्या जिल्ह्यांमध्ये तथा मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उद्या अर्थातच 11 एप्रिल 2024 ला देखील विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुफान गारपीट होऊ शकते असे आयएमडीने म्हटले आहे. तसेच उद्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.
12 तारखेला देखील विदर्भात एक-दोन जिल्ह्यांमध्ये गारपीट होऊ शकते असा अंदाज आयएमडीने दिला असून या दिवशी राज्यातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.