इंदूर : मध्य प्रदेशात धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने दोन जणांची हत्या केली आहे. ही हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपीने दोघांची हत्या करून आत्महत्या केली आहे.
इंदूर शहरात एका तरुणाने त्याची गर्लफ्रेंड आणि तिच्या मित्राची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर त्याच देशी कट्ट्याने आपल्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलीस उपायुक्त (डीसीपी) हृषीकेश मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक यादव (वय 26) नावाच्या तरुणाने खंडवा रोडवरच्या स्वामीनारायण मंदिर परिसरात स्नेहलता जाट (वय 22) आणि तिचा मित्र दीपक जाट (वय 25) या दोघांवर गोळ्या झाडल्या. त्यांना मारण्यासाठी अभिषेकने देशी कट्टा वापरला. यानंतर त्याने त्याच पिस्तुलाने स्वतःवर गोळी झाडली आणि आत्महत्या केली. ते पिस्तुल पोलिसांनी जप्त केलं आहे.
पोलीस अधिकाऱ्याने या प्रकरणाबद्दल माहिती दिली आहे. हे दुहेरी हत्याकांड आणि आत्महत्येची घटना त्रिकोणी प्रेमप्रकरणातून घडल्याचं प्राथमिकरीत्या दिसतंय; मात्र हत्येचं नेमकं कारण काय, ते शोधण्यासाठी तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. हृषीकेश मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मध्य प्रदेशातल्या सिहोरचा रहिवासी आहे. स्नेहलता, अभिषेक आणि दीपक या घटनेआधी जवळपास अर्धा तास बोलत होते. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि अभिषेकने त्या दोघांना संपवून आत्महत्या केली, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
अतिरिक्त पोलीस उपायुक्त (ADCP) आनंद यादव म्हणाले, अभिषेक यादव आणि स्नेहलता यांची दोन वर्षांपूर्वी मैत्री झाली होती; मात्र गेल्या काही काळापासून स्नेहलता आरोपीपासून अंतर राखून वागत होती. त्यामुळे तो खूप अस्वस्थ होता. आरोपी अभिषेकने आधी दीपक जाटवर दोन गोळ्या झाडल्या. यानंतर घाबरलेली स्नेहलता दीपकला चिकटली, त्यानंतर आरोपीने तिच्यावरही दोन गोळ्या झाडल्या. दोघांची हत्या केल्यानंतर अभिषेक यादव इकडे-तिकडे धावत सुटला आणि शेवटी एका प्रायव्हेट कॉलेजच्या कॅम्पसमध्ये शिरला. तिथे त्याने स्वतःच्या डोक्यावर पिस्तुल ठेवून ट्रिगर दाबला आणि आत्महत्या केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.