तामिळनाडूत एका मंदिर उत्सवात 9 लिंबू तब्बल 2 लाख 36 हजारांना विकण्यात आले आहेत. विल्लूपुरम जिल्ह्यात पार पडलेल्या मंदिरातील उत्सवात लिंबूंचा लिलाव करण्यात आला. मंदिरातील देवतेच्या पवित्र भाल्यावर खोचण्यात आलेल्या या लिंबूचे सेवन केल्यानं वंध्यत्व दूर होतं, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
यामुळेच हे लिंबू विकत घेण्यासाठी भाविकांनी हजारो, लाखो रुपये मोजले. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
विल्लुपुरममधील भगवान मुरुगाच्या मंदिराचं व्यवस्थापन वार्षिक पांगुनी उत्तरम उत्सवादरम्यान लिंबांचा लिलाव करतात. यावेळी मूल होण्याची इच्छा असणारे किंवा प्रत्न करणारे लिलावात हे लिंबू खरेदी करण्यासाठी पोहोचत असतात. हा उत्सव एकूण 9 दिवसांचा असतो. उत्सवाच्या पहिल्या भाल्यावर लावलेला लिंबू सर्वांत शक्तिशाली असल्याची भक्तांची श्रद्धा आहे. एका जोडप्याने हा लिंबू विकत घेण्यसााठी 50 हजार 500 रुपये मोजले.
रिपोर्टनुसार, 9 दिवस चालणाऱ्या मंदिर उत्सवाच्या प्रत्येक दिवशी पुजारी देवतेच्या भाल्यावर एक लिंबू लावतात. एका गावकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हे लिंबू मिळवण्यासाठी येणाऱ्यांमध्ये फक्त मुलाची इच्छा असणारी जोडपी नसतात. यात व्यावसायिक, व्यापारीही असतात. लिंबूमुळे आपलं नशीब उजळण्याची आशा असल्याने तेदेखील या लिलावात भाग घेतात.
जे लोक लिंबू विकत घेतात त्यांना इच्छा पूर्ण होण्यासाठी पुजारीसमोर गुडघे टेकून पवित्र स्नान करावे लागते. 2018 मध्ये, तामिळनाडूच्या इरोड जिल्ह्यात मंदिर उत्सवाचा भाग म्हणून आयोजित केलेल्या लिलावात लिंबूवर 7600 रुपयांची बोली लावण्यात आली होती. हे लिंबू महाशिवरात्री उत्सवादरम्यान पाजथिन्नी करुपन्नन मंदिरात लिलावासाठी ठेवण्यात आले होते.
लिंबूला वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये महत्व आहे. अनेकदा पवित्रता, शुद्धीकरण आणि विविध संस्कृतींमध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचं प्रतीक म्हणून लिंबूची ओळख आहे. भारतातील अनेक भागांमध्ये, लिंबू आणि हिरवी मिरची दुष्ट आत्म्यांना दूर ठेवण्यासाठी दरवाजावर आणि वाहनांच्या आत टांगल्या जातात. काळ्या जादूतही लिंबूचा वापर केला जातो.