पाकव्याप्त काश्मीर (पाकिस्तानमधील उल्लेख: आझाद कश्मीर / आझाद जम्मू और कश्मीर) हा सध्याच्या घडीला पाकिस्तान देशाचा एक प्रशासकीय प्रदेश व ऐतिहासिक काश्मीर संस्थानाचा एक भाग आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर काश्मीरच्या विलीनीकरणानंतर झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर पाकिस्तानने हा भूभाग बळकवला.
लोकसभा निवडणुकांची घोषणा होताच विविध राजकीय पक्षांकडून घोषणा करण्यात येत आहे. अशातच लोकसभा निवडणुकीआधी पाकव्याप्त काश्मीरबाबत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी मोठी घोषणा केली आहे.
लवकरच पाकव्याप्त काश्मिर भारतात येईल आणि त्यासाठी कोणतेही युद्ध करण्याची गरज नाही असे राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. कलम 370 हटवल्यानंतर आता राजनाथ सिंह यांच्या या विधानाची सध्या देशभरात चर्चा सुरु झाली आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी लेहमध्ये जवानांसोबत होळी साजरी केली. यावेळी त्यांच्यासोबत लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि फायर अँड फ्युरी कॉर्प्सचे जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल रशीम बाली उपस्थित होते. राजनाथ सिंह यांनी यावेळी होळीच्या निमित्ताने सैनिकांना संबोधित केले आणि त्यांच्या शौर्याचे, दृढनिश्चयाचे आणि बलिदानाचे कौतुक केले. त्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीमध्ये राजनाथ सिंह यांनी हे विधान केलं आहे.
“पाकव्याप्त काश्मिर आपलं होतं आणि आपलंच राहणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ कधी काश्मीर घेऊ शकतात का? त्यांना पाकव्याप्त काश्मिरची काळजी वाटायला हवी. त्याच्यावर हल्ला करून ते आपल्याकडे घेण्याची काही गरज नाही हे मी दीड वर्षांपूर्वीच सांगितल होते. पाकव्याप्त काश्मीरमधील लोक स्वतः भारतात विलीन होण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन होईल. तिथे अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे की पीओकेचे लोक स्वत: भारतात विलीन होऊ इच्छित आहेत,” असे संरक्षण राजनाथ सिंह म्हणाले.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना सरकार यासाठी काही योजना करत आहे का? असाही सवाल विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना राजनाथ सिंह यांनी, “मी याविषयी जास्त काही बोलणार नाही. मला काही बोलण्याची आवश्यकताही नाही. आम्ही कोणत्याही देशावर हल्ला करणार नाही. भारताचे वैशिष्ट्य असे आहे की, तो जगातील कोणत्याही देशावर कधीही हल्ला करत नाही किंवा कोणत्याही देशाचा एक इंचही प्रदेश ताब्यात घेतला आहे. पण पाकव्याप्त काश्मिर आमचेच असून आमचेच राहणार,” असे म्हटलं.
यावेळी संरक्षण मंत्र्यांना चीन भारतावर हल्ला करू शकतो का? असाही सवाल करण्यात आला. त्यावर बोलताना, “देव त्यांना सद्बुद्धी देवो जेणेकरुन त्यांनी असे प्रकार करू नयेत. भारत कुणालाही चिडवत नाही, पण जर कुणी भारताचा सन्मान दुखावला तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्याची क्षमताही भारताकडे आहे. आपल्या सर्वांना शेजाऱ्यांशी चांगले संबंध हवे आहेत,” असे राजनाथ सिंह यांनी म्हटलं.