महायुतीमध्ये मनसेला मिळणार ‘हा’ मतदारसंघ; कोणत्या चिन्हा वर लढवे लागणार?
महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये. आज दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.
या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वी मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मनसेला महायुतीमध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ मिळण्याची शक्यता आहे. महायुतीच्या बैठकीत मनसेला दक्षिण मुंबईची जागा देण्यावर एकमत झालं आहे.
मिळत असलेल्या माहितीप्रमाणे महायुतीच्या बैठकीत मनसेला दक्षिण मुंबईची जागा देण्यावर एकमत झालं आहे. मात्र मनसे कोणत्या चिन्हावर निवडणूक लढणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाहीये. मनसे कोणत्या चिन्हावर ही जागा लढवणार त्यावर आज दिल्लीत शिक्कामोर्तब होणार आहे. दिल्लीच्या बैठकीत झालेला निर्णय मनसेप्रमुख राज ठाकरे यांना कळवला जाणार आहे. रेल्वे इंजिनवर लोकसभेची निवडणूक लढवण्यावर मनसे अजूनही ठाम आहे. मात्र महायुतीकडून मनसेला धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. हा प्रस्ताव राज ठाकरे यांनी मान्य केला की नाही याबाबत अजूनही स्पष्टता नाही, मात्र मनसेला दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा देण्यावर एकमत झाल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान आज दिल्लीमध्ये महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहेत. आज जागा वाटपावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. जागा वाटपावर तोगडा निघाल्यानंतर उमेदवारांची यादी समोर येणार आहे.