वेश्या व्यवसायासाठी मुली पुरवण्याऱ्या पोलिसांनी ठोकल्या बेड्या,अनैतिक व्यवसायासाठी आणलेल्या दोन पीडित मुलींची सुटका
मिरा-भाईंदरसह, ठाणे, मुंबई येथे वेश्या व्यवसायासाठी मुली पुरवण्याचे काम एका बांगलादेशी दलालाकडून केले जात असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या भाईंदर येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने या दलालाला अटक केली आहे.
मुंबईतील अंधेरी येथील चार बंगला परिसरात वास्तव्यास असलेला सुलतान ऊर्फ मोहम्मद आलमगिर अब्दुल मोजीत मंडल व त्याचे दोन साथीदार हे वेश्या व्यवसायातील दलाल आहेत. गिऱ्हाईकांनी त्यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला की मुंबई, ठाणे, काशी-मिरा व मिरा-भाईंदर या परिसरातील लॉजमध्ये अनैतिक कामासाठी मुली पुरवतात व मोबदला, त्यांचे कमिशन असे एकूण १५ हजार रुपये घेतात, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानंतर निरीक्षक समीर अहिरराव यांनी सहकाऱ्यांसह बोगस गिहाईकाच्या माध्यमातून दलालाशी संपर्क साधला. व्यवहार ठरल्यानंतर काशी-मिरा परिसरातील लॉजमध्ये सापळा रचण्यात आला. या वेळी संशयित आरोपी सुलतान ऊर्फ मोहम्मद आलमगिर अब्दुल मोजीत मंडल याला रक्कम घेताना पकडण्यात आले.
चौकशीत आरोपीने तो पारपत्र व व्हिसाशिवाय भारतात अनधिकृतपणे प्रवेश करून अंधेरी परिसरात चार महिन्यांपासून वास्तव्य करत असल्याचे कबूल केले. या वेळी अनैतिक व्यवसायासाठी आणलेल्या दोन पीडित मुलींची सुटका करण्यात आली. त्याच्याविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा, तसेच परकीय नागरिक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.