संयुक्त किसान मोर्चाने दिल्ली चलो आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी (ता. १६) भारत बंदचे आवाहन केले आहे. पंजाबच्या शेतकऱ्यांचा आंदोलनाचा आज चौथा दिवस होता. पंजाबचे शेतकरी चार दिवसांपासून हरियानाच्या शंभू सीमेवर अडून बसले आहेत.
बॅरिकेड्सच्या मदतीने पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखून धरले आहे. हरियानालगत पंजाबच्या खनौरी आणि डबवाली सीमा चार दिवसांपासून बंद आहे. दरम्यान, सिसाय गावात महापंचायत भरविण्यात आली आणि आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला.
भारत बंद सकाळी ६ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. देशभरातील शेतकरी विविध मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्याचा प्रयत्न करतील. पंजाबचे रस्ते चार तासांसाठी बंद करण्याचे नियोजन आहे. अत्यावश्यक सेवा जसे भाजीपाला, धान्य खरेदी आणि पुरवठा बंद केला जाणार आहे. शेतकरी मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चा यांनी सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी १६ फेब्रुवारीला भारत बंदचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर पंजाब, हरियाना येथे दक्षता बाळगली जात आहे.
सध्या शंभू सीमेवर तणावाचे वातावरण आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने पंजाबमधील तीन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद केली आहे. या कार्यवाहीबाबत पंजाब सरकारने आक्षेप घेतला आहे. शंभू सीमेवर शेतकऱ्यांवरचा लाठीमार आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याच्या निषेधार्थ सिसाय गावातील चौकात शेतकऱ्यांनी महापंचायत बोलावली.
सिसाय गावचे सरपंच राजेश सिहाग यांनी महापंचायतचे अध्यक्षपद भूषविले. या बैठकीत हिसार जिल्ह्यातील ४० गावांतील शेतकरी आणि ग्रामस्थांनी सहभाग घेतला. या बैठकीत हरियाना आणि पंजाबच्या शेतकऱ्यांना दिल्लीकडे जाण्याच्या निर्णयाला समर्थन देणे, दिल्लीपर्यंत कोणत्याही स्थितीत पोचणे, आंदोलनकर्त्यांना मदत करणे आणि सरकारविरुद्ध व्यापक आंदोलन करण्याचा निर्धार केला. तसेच जिल्ह्यातील शेतकरी गावागावांत जाऊन संपर्क अभियान राबविणार आहेत. ट्रॅक्टर मोर्चा काढून पंजाबच्या शेतकऱ्यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन महापंचायतीत करण्यात आले. पोलिसांकडून शेतकरी आंदोलकांना अडविले जात असून इंटरनेट बंद करण्यात येत आहे. अशा प्रकारची कारवाई लोकशाहीवर हल्ला असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, राष्ट्रीय किसान मोर्चाच्या आवाहनानुसार, पिलभित येथे शेतकऱ्यांच्या महापंचायतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांवरील खटले मागे घेणे यासह अनेक मागण्यांवरून सरकारसमोर प्रस्ताव मांडण्याचेठरविण्यात आले आहे.
टिकरी सीमेवर सुरक्षा व्यवस्था चोख असून शेतकरी आंदोलन सुरू असताना मंडळाच्या परीक्षेत कोणताही विलंब होणार नाही, असे सांगितले आहे. विद्यार्थ्यांन मदत करण्यासाठी पोलिस आणि निमलष्करी दलाच्या वाहने तैनात केली जाणार असून त्या माध्यमातून मुलांना परीक्षा केंद्रावर सोडण्यात येणार आहे. टिकरी सीमा मेट्रो स्टेशनजवळ दोन शाळा आहेत. तेथून शाळा पायी जाण्यासारखे असून पोलिसांच्या वाहनातून त्यांना सोडले जाईल. तसेच दुचाकीवरून पाल्यांना सोडण्यात येणाऱ्या पालकांना देखील पोलिस मदत करतील. संयुक्त किसान मोर्चाने दिल्ली चलो पाठिंबा दिल्याने आणि भारत बंदचे आवाहन केल्याने पालकांची चिंता वाढली आहे.