‘त्या’ प्रकरणातून धनंजय मुंडेंची मुक्तता; न्यायालयाने मोठा दिलासा देत केलं दोषमुक्त
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असताना धनंजय मुंडेंवर विविध आरोप करण्यात आले होते. यामुळे अडचणीत आलेल्या धनंजय मुंडेंना न्यायालयाने मोठा दिलासा देत दोषमुक्त केलं आहे.
बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील जगमित्र साखर कारखान्यासाठी मुंजा गित्ते यांच्या जमीन खरेदीबाबत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. दाखल झालेल्या दोषारोपपत्रातून, न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मिक अण्णा कराड तसेच सूर्यभान मुंडे यांना दोषमुक्त केले आहे.
अंबाजोगाई अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी या प्रकरणात धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि सूर्यभान मुंडे यांच्या विरोधात कोणताही पुरावा नसल्याना हा निर्णय घेतलाय. तसेच तिघांनाही या प्रकरणातून दोषमुक्त केले आहे.
तक्रारदार मुंजा गित्ते या शेतकऱ्याने पूस कारखान्यासाठी कमी पैश्यात जमीन बळकावली. तसेच 40 लाखांचे धनादेश वटले नाही, नोकरी लावण्याचे आश्वासन दिले असे विविध आरोप केले होते. मुंजा गित्ते व अन्य काही शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून 2018 साली बरदापुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
त्यानंतर पोलिसांनी याबाबत तपास करून अंबाजोगाई न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. ते सर्व आरोप कोणताही पुरावा नसल्याने न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. दरम्यान अखेर धनंजय मुंडे यांनी मुंजा गित्ते प्रकरणातील लढाई न्यायालयात जिंकली असून त्यांना आता क्लीन चिट मिळाली आहे.