पाकिस्तानात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे सर्व निकाल जाहीर झाले असून कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नसल्याचे राजकीय गोंधळाची स्थिती कायम आहे. इम्रान खान समर्थक अपक्षांना १०१ जागांवर विजय मिळाला असून त्यांच्या पक्षाने सत्तास्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
दुसरीकडे ७५ जागांसह नवाज शरीफ यांचा पक्ष अधिकृतरित्या सर्वात मोठा असून त्यांनीही सरकार बनविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. इम्रान खानसमर्थकांनी रस्त्यावर येऊन आंदोलने सुरू केली असल्यामुळे परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे.
अखेर पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने निकाल जाहीर केले असून खान यांच्या पाकिस्तान तहरिक-ए-एन्साफ पक्षाचे समर्थक असलेले १०१ अपक्ष निवडून आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या पक्षाने सत्तास्थापनेसाठी १३३चा आकडा गाठण्यासाठी त्यांना ३२ सदस्यांची आवश्यकता आहे. तर लष्कराने जाहीर पाठिंबा देऊ केलेले माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षाने अन्य पक्षांशी बोलणी सुरू केली आहेत. इम्रान खान यांचे सरकार पडल्यानंतर पीएमएल-एन आणि बिलावत भुत्तो-झरदारी यांच्या पाकिस्तान पिपल्स पार्टीसह अन्य छोटया पक्षांसह सत्ता स्थापन केली होती. आता पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. आताही पीएमएल-एन व पीपीपी मिळून १२९ सदस्य असून त्यांना इतरांचा पाठिंबा मिळवावा लागेल. नवाज शरीफ यांनी आपला धाकटा भाऊ आणि माजी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावर ही जमवाजमव करण्याची जबाबदारी टाकली आहे. शाहबाज यांनी पीपीपी नेत्यांच्या भेटी घेतल्या असून पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंट (पीडीएम) या नावाने आघाडी स्थापन करण्याबाबत चर्चा झाली आहे. आवश्यक संख्याबळ जमल्यास शाहबाज यांना पंतप्रधान आणि मरियम शरीफ यांना पंजाबचे मुख्यमंत्री केले जाईल,अशी माहिती सूत्रांनी दिली. शाहबाज यांना लष्कराचाही पाठिंबा आहे. दुसरीकडे पीपीपीच्या सहकार्याशिवाय राष्ट्रीय पातळीवर, तसेच पंजाब व बलुचिस्तानात प्रांतांत सरकारे स्थापन होऊ शकणार नाहीत, असे सांगत बिलावल यांनी आपले महत्त्व वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ. खालिद मकबूल सिद्दिकी यांच्या नेतृत्वाखालील एमक्यूएम-पीच्या शिष्टमंडळाने रविवारी पीएमएलएनच्या विविध नेत्यांशी चर्चा केली असून त्यांच्यात सरकार स्थापनेसाठी एकत्र काम करण्यावर तत्वत: सहमती झाल्याचे सांगण्यात आले.
सार्वत्रिक निवडणुकीत गुरुवारी २६६ जागांवर मतदान होणार होते. मात्र, एका उमेदवाराचे निधन झाल्यामुळे तिथे निवडणूक पुढे ढकलण्यात आली. उर्वरित २६५ जागांपैकी २६४ जागांचे निकाल रविवारी जाहीर झाले. पंजाब प्रांतामधील खुशाब मतदारसंघामध्ये घोटाळयाच्या आरोपामुळे निवडणूक आयोगाने निकाल राखून ठेवला आहे.
तीन प्रांतांचे निकाल जाहीर
पंजाब, सिंध आणि खैबर पख्तुनख्वा या तीन प्रांतांमधील असेंब्लींसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. पंजाबच्या २९६ जागांपैकी १३८ अपक्ष तर पीएमएलएनला १३७ जागा मिळाल्या आहेत. अन्य पक्षांना २१ मिळाल्या. सिंधमध्ये १३० जागांवर मतदान झाले होते. त्यापैकी १२९ ठिकाणी निकाल जाहीर झाले आहेत. खैबर पख्तुनख्वामध्ये ११३ जागांपैकी ११२ जागांचे निकाल जाहीर करण्यात आले असून एके ठिकाणी निकाल राखून ठेवण्यात आला आहे. बलुचिस्तानमध्ये मात्र, अद्याप निकाल जाहीर झालेले नाहीत.
नॅशनल असेंब्ली’ची रचना
पाकिस्तान ‘पार्लमेंट’च्या ‘नॅशनल असेंब्ली’ या कनिष्ठ सभागृहामध्ये एकूण ३३६ जागा आहेत. त्यापैकी २६६ जागांवर थेट मतदानाद्वारे सदस्य निवडले जातात. उरलेल्या ७० जागा महिला व अल्पसंख्याकांसाठी राखीव आहेत. या जागा सरकार स्थापनेनंतर भरल्या जातात. ‘नॅशनल असेंब्ली’मध्ये साध्या बहुमतासाठी १६९ जागांची गरज असते.
‘पीटीआय’ कार्यकर्ते आक्रमक
निवडणूक निकालांमध्ये गोंधळ झाल्याचा आरोप करत इम्रान खान यांचे शेकडो समर्थक रविवारी पाकिस्तानच्या रस्त्यांवर उतरले. जनतेने दिलेला निकाल मान्य करावा व पीटीआयला सत्तास्थापनेचे निमंत्रण द्यावी, अशी मागणी आंदोलक करीत आहेत. दुसरीकडे, देशभरातील न्यायालयांमध्ये याचिकांचा पूर आला असून पीटीआयच्या बहुतांश पराभूत उमेदवारांनी निकालांना आव्हान दिले आहे.
लाहोरमध्ये नवाज शरीफ, मरियम नवाज यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या विजयी उमेदवारांविरोधात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
जनतेने आपली इच्छा बोलूनच नव्हे तर ओरडून सांगितली आहे. त्यांनी लोकशाहीवरील आपला विश्वास स्पष्ट केला आहे. याची नोंद इतिहासात होईल.
– अरीफ अल्वी, अध्यक्ष, पाकिस्तान(अल्वी हे इम्रान खान यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत)
निवडणूक निकाल
पीटीआय समर्थक अपक्ष – १०१
पीएमएल-एन – ७५
पीपीपी – ५४
एमक्यूएम-पी – १७
बहुमताचा आकडा – १३३