बीड सभेपूर्वीच आरक्षणासाठी ५० वर्षीय व्यक्तीने संपवलं जीवन,चिठ्ठीत केली ‘ही’ मागणी
बीड : जरांगेंच्या ‘निर्णायक इशारा’ सभेपूर्वीच आरक्षणासाठी बीडमध्ये ५० वर्षीय व्यक्तीने संपवलं जीवन! चिठ्ठीत केली ‘ही’ मागणी
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मागील बऱ्याच दिवसांपासून आंदोलने केली जात आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम उद्या (२४ डिसेंबर) रोजी संपणार आहे. यापूर्वी त्यांची मराठवाड्यातील बीड येथे जंगी सभा आयोजित करण्यात आली आहे.
इशारा सभेत जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र या सभेपूर्वीच बीड शहरात एका ५० वर्षीय व्यक्तीने मराठा आरक्षणासाठी जीवन संपवल्याचा प्रकार समोर आला आहे.
बीड शहरातील बार्शी नाका परिसरामध्ये शुक्रवारी (२२ डिसेंबर) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून मधुकर खंडेराव शिंगण असे जीवन संपवलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
हे टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी मयत मधुकर शिंगण यांनी एक चिठ्ठी लिहिली आहे, त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, राम राम… मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. मी मराठा आरक्षणासाठी जीवन संपवत आहे. मनोज जरांगे पाटील हे चांगलं काम करत आहेत. त्यांनी माझ्या कुटुंबाला भेट द्यावी, अशा आशयाचा मजकूर चिठ्ठीमध्ये लिहिलेला आहे. मधुकर शिंगण यांनी आरक्षणासाठी टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
”देव जरी खाली आला तरी आरक्षणाशिवाय राहणार नाही” – मनोज जरांगे पाटील