जालना : तुला हॉटेल चालवायचे असेल तर महिन्याला पाच हजार रूपये दे अन्यथा दुकान चालू देणार नाही अशी धमकी देत चौघांनी बॉटल व चाकुने भोसकून हॉटेल मालकास गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी सांयकाळी राजूर येथे घडली.
याप्रकरणी चार जणाविरूध्द राजूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, एक जण फरार झाला आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागात सुध्दा भाईगिरीचे लोण पसरत असल्याची चर्चा होत आहे.
राजूर येथे जालना मार्गावरील पेट्रोल पंपाशेजारी दिनेश जैस्वाल यांचे खानावळीचे आनंद हॉटेल आहे. रविवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सागर साहेबराव पवार, बाळू सखाराम पुंगळे, ज्ञानेश्वर भास्कर पुंगळे, बादल भाऊसिंग सुर्यवंशी (सर्व रा.राजूर) हे चौघे हॉटेलमध्ये गेले. दिनेशचा भाऊ राजेंद्र याला तुला हॉटेल चालवायचे असेल तर महिन्याला पाच हजार रूपये द्यावे लागतील अन्यथा तुझी हॉटेल चालू देणार नाही, असे म्हणत शिवीगाळ केली. दिनेशने तुम्हाला पैसे कशाचे दयायचे मी देणार नाही, असे म्हणताच त्या चौघांनी दिनेशच्या डोक्यात थंडपेयाच्या बॉटल मारल्या. फायटरने मारहाण करून पोटात चाकूने वार करीत गंभीर जखमी केले. हॉटेलातील खुर्च्या- टेबलांची तोडफोड केली.
या घटनेत दिनेश जैस्वाल गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जालना येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी राजेंद्र जैस्वाल याच्या फिर्यादीवरून वरिल चौघांविरूध्द भा.दं.वि. ३०७, २३४, ३२३, ५०४, ५०६, ४२७, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सागर पवार, ज्ञानेश्वर पुंगळे, बादल सुर्यवंशी यांना अटक केली असून, बाळू पुंगळे याचा शोध सुरू आहे. तपास सपोनि. शिवाजी नागवे हे करीत आहेत.
उसाच्या फडात रंगेहाथ पकडलं, प्रियकराला उसाने मारहाण करून शिवीगाळ,प्रेमीयुगुलाला दिली भयानक शिक्षा