कोल्हापूर : दारूच्या नशेत मोबाईल हॅण्डसेट घेण्याच्या वादातून काल (सोमवार) रात्री फिरस्ता मजुराच्या डोक्यात सोडा वॉटरच्या बाटल्या घालून खून करण्यात आला.
विनायक विश्वास लोंढे (वय ३२, विचारे माळ, सदर बाजार) असे त्याचे नाव आहे.
संशयित आणि त्याचा मित्र लखन ऊर्फ समीर युनूस मणेर (३२, रा. महालक्ष्मीनगर, कदमवाडी, सध्या विक्रमनगर) याला पोलिसांनी तासाभरात अटक केली. दाभोळकर कॉर्नरजवळील पादचारी उड्डाणपुलाखाली रात्री साडेआठच्या सुमारास खून झाला.
शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी : विनायक मिळेल ते काम करून पोट भरत होता. त्याच्यासोबत समीर नेहमी असायचा. रात्री दोघेही मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील पादचारी उड्डाणपुलाखालील खाद्यपदार्थाच्या गाड्यावर थांबत होते. तेथेच दारू पिऊन गप्पा मारत होते. आजही तेथे दोघे दारू पिऊन गप्पा मारताना परिसरातील अन्य दोघे तेथे होते. यावेळी समीरचा मोबाईल हॅण्डसेट घेतल्यावरून वाद झाला.
त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले. यावेळी समीरने थेट सोडा वॉटर बाटल्यांचा क्रेट, बिअर आणि दारूच्या बाटल्या विनायकच्या डोक्यात घातल्या. त्यामुळे विनायक तेथेच कोसळला. परिसरातील जावेद मणेरने त्याला तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, तेथे उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
खुनानंतरही परिसरातील दारूच्या दुकानासह सर्व व्यवहार सुरळीत होते. केवळ खाद्यपदार्थाची गाडी बंद होती. घटनास्थळी बाटल्यांसह काचांचा खच पडला होता. यावरून तेथे झटापट आणि बाटल्या फेकून मारण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे.
शाहूपुरी पोलिसांची दोन पथके तातडीने घटनास्थळ आणि रुग्णालयात पोहोचली. घटनास्थळावर दारूच्या नशेतील समीरला ताब्यात घेतले. रुग्णालयातील गर्दी पोलिसांनी बंदोबस्त वाढवून हटविली. घटनास्थळाचा पंचनामा आणि सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पोलिस निरीक्षक अजय सिंदकर, सहायक निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ, उपनिरीक्षक सुनीता शेळके, डी. बी. शाखेचे प्रमुख सहाय्यक फौजदार संदीप जाधव, कॉन्स्टेबल रवी आंबेकर, बाबा ढाकणे आदींनी तपास सुरू केला.
लखन ऊर्फ समीर युनूस मणेर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याला काही दिवसांपूर्वीच शाहूपुरी पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. यापूर्वीही त्याच्यावर अपघाताचा गुन्हा आहे, असे पोलिसांनी सांगितले.
समीर पळून जाण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला रक्ताने माखलेल्या कपड्यांसह ताब्यात घेतले. त्याला शाहूपुरी पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ‘त्याचा मोबाईल हॅण्डसेट काढून घेतल्यामुळे वाद झाला. वादावेळी आणखी दोघे होते. याची खात्री करण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळविण्याचा प्रयत्न रात्री उशिरापर्यंत केला.