पुन्हा नारा, चला देऊ सरकारला इशारा,पुढील धोरण बीडच्या इशारा सभेतूनच जाहीर करु
बीड : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील पहिल्या उपोषणापासून जिल्हा केंद्रस्थानी आहे. आता त्यांची इशारा सभा शनिवारी (ता.२३) बीडला होणार अाहे. ‘चला देऊ सरकारला इशारा’ असा नारा जिल्हाभरात घुमत आहे. सभेच्या मैदानाची सफाई रविवार (ता. १७) पासून सुरु झाली.
धुळे – सोलापूर महामार्गावरील बीड जवळील बाह्यवळण रस्त्याच्या छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरातील शेतात सभेसाठी मैदान तयार करण्यात येत आहे. यासाठी समाजातील व्यवसायिकांनी जेसीबी व ट्रॅक्टर मोफत दिले आहेत. या मैदानाला पाटील मैदान असे नाव देण्यात आले आहे
अंतरवाली सराटी येथे श्री. जरांगे पाटील यांनी प्रथम उपोषण सुरु केले तेव्हाही उपोषणार्थीत जिल्ह्याची लक्षणीय उपस्थिती होती. त्यानंतर साखळी उपोषणे, ठिय्या आंदोलनातही जिल्हा अग्रेसर राहीला. जिल्ह्यात त्यांच्या झालेल्या दोन्ही टप्प्यांतील सभा व संवाद दौऱ्यांनाही उदंड प्रतिसाद मिळाला. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यात उपोषण केल्यानंतर सरकारने त्यांना दोन महिन्यांचा अवधी मागीतला होता. याची मुदत २४ तारखेला संपणार असल्याने पुढे काय, याबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांची येत्या ता. २३ रोजी बीडला इशारा सभा जाहीर झाली आहे.
अंतरवाली सराटीत देखील मनोज जरांगे पाटील यांनी पुढील धोरण बीडच्या इशारा सभेतूनच जाहीर करु, असे घोषीत केल्याने या सभेकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. गुरुवारी (ता. १४) मनोज जरांगे पाटील यांनीच बीडची सभा जाहीर केल्यानंतर बीडमध्ये समाज बांधव पुन्हा एकवटले आहेत. या निमित्त आता विविध ठिकाणी बैठकाही होत आहेत. बैठकांमधून सभेला उपस्थितीचे आवाहन समाज बांधव करत आहेत. दरम्यान, सभेवेळी २०१ जेसीबी पुष्पवृष्टीसाठी केली जाणार आहे. तर २५ हायवा या फुलांच्या असणार आहेत. सभेची रिक्षाद्वारे जनजागृती केली जात आहे.