मुंबईः महाविकास आघाडीला धक्का देऊ पाहणाऱ्या एकनाथ शिंदे गटालाच मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदारांना सोबत घेऊन निघालेल्या एकनाथ शिंदे गटाला कायद्यानंच उत्तर देण्याचं शिवसेनेनं ठरवलं आहे.
शिवसेनेनं सुप्रीम कोर्टाचे वकील देवदत्त कामत यांनी शिंदे गटाने केलेल्या मागण्या आणि दावे खोडून काढले. यासाठी कायदेशीर आधार असल्याचंही त्यांनी सांगितलं. राजकीय बाबींवर मी बोलणार नसून सदर घटेतील कायदेशीर बाजूंवरच मी प्रकाश टाकतोय, अस कामत यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं. सध्या शिंदे गट आणि पक्ष म्हणून उद्धव ठाकरे अशा दोन्ही बाजूंनी काही कारवाई आणि मागण्या केल्या जात आहेत, त्याबाबत अनेक भ्रम निर्माण होत असून ते दूर करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. या सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मोठ्या संख्येनं आमदार घेऊन बाहेर पडेलेल्या एकनाथ शिंदे गटाला दुसऱ्या नावाने गट निर्माण करता येनार नाही. त्यांना भाजप किंवा दुसऱ्या पक्षात जाणे एवढाच पर्याय समोर आहे, असं कामत यांनी स्पष्ट केलं.