अंबाजोगाईक्राईमताज्या बातम्याबीड जिल्हा

हळदीच्या कार्यक्रमात नवरदेवासह त्याच्या मित्रांचा हवेत गोळीबार, नवरदेवाची रवानगी पोलीस कोठडीमध्ये


बीड: (अंबाजोगाई ) हळदीच्या कार्यक्रमात हवेत गोळीबार करणाऱ्या नवरदेव आणि त्याच्या मित्राना आता पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अंबाजोगाई शहराजवळील सायली लॉन्स या मंगल कार्यालयात 26 मार्च रोजी हळदीच्या कार्यक्रमात नवरदेवासह त्याच्या मित्राने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली होती.
या प्रकरणातील आरोपी असलेल्या नवरदेवासह त्याच्या मित्राला अंबाजोगाई शहर पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले.

बालाजी भास्कर चाटे असे अटक केलेल्या नवरदेवाचे तर बाबा शेख असे त्याच्या मित्राचे नाव आहे. हे दोघे साकुड येथील शेतात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने दोघांना रात्री ताब्यात घेतले.

बीड जिल्ह्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह
मागच्या काही दिवसापासून बीडमधल्या ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरशः रोज धिंडवडे निघताना पाहायला मिळत आहेत. एकीकडे वाळू माफियांनी उच्छाद मांडलेला असतानाच खून, दरोडे यासारख्या घटना रोजच घडत आहेत. ना या घटनांवरती कुणाचा वचक राहिला आहे, ना पोलिसाकडून कायद्याचे राज्य प्रस्थापित होण्यासाठी काही प्रयत्न होताना पाहायला मिळत नाहीत.

बीड जिल्ह्यातील आमदारांनी अधिवेशनादरम्यान लक्षवेधी मांडून बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कशी बिघडली आहे हे विधानभवनात सांगितले होते. यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांना सक्तीच्या रजेवर पाठवत असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली होती.

या सगळ्या घटना घडत असतानाच कहर म्हणजे अंबाजोगाई शहरात हळदीच्या कार्यक्रमात डिजेच्या तालावर नाचत नवरदेव आणि त्याच्या मित्रांनी चक्क पिस्तुलं बाहेर काढून हवेत गोळीबार केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ उडाली आणि पोलीस प्रशासनाने नवरदेवासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला.

अंबाजोगाईतील केज रोडवर असलेल्या एका मंगल कार्यालयात बालाजी भास्कर चाटे (रा. साकूड, ता. अंबाजोगाई) या तरुणाचा हळदी समारंभ होता. हळदी समारंभ पार पडल्यानंतर रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास नवरदेव असलेल्या बालाजीनेही जमलेल्या मित्रांसोबत डिजेच्या तालावर ठेका धरला. थोड्याच वेळात आनंद ओव्हरफ्लो झालेल्या बालाजी आणि त्याच्या मित्रांनी जवळील पिस्तुलं काढली आणि हवेत गोळीबाराच्या फैरी झाडण्यास सुरुवात केली. कोणीतरी याचा व्हिडीओ केला आणि बघता बघता हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला.

अंबाजोगाई शहर पोलिसांनी पो.ना. गोविंद येलमाटे यांच्या फिर्यादीवरून बालाजी चाटे, शेख बाबा (रा. क्रांती नगर, अंबाजोगाई) आणि इतर तिघांवर अवैधरीत्या पिस्टल हातात घेऊन इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्या प्रकरणी कलम 336 सह शस्त्रास्त्र कायदा कलम 3, 25 अन्वये गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक गोपाळ सूर्यवंशी पुढील तपास करत आहेत. एरवी शांत म्हणून प्रसिद्ध असलेल्या अंबाजोगाई शहरात अशा वाढत्या घटनांमुळे चिंतेचे वातवरण आहे..

या घटनेनंतर पोलिसांनी या नवरदेवाला पकडण्यासाठी शोध कार्य सुरू केले होते. मात्र त्यात पोलिसांना लवकर यश आले नाही. मात्र रात्री एका शेतात लपून बसलेले असताना नवरदेव बालाजी केंद्रे आणि त्याचा एक साथीदार या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून सध्या हे दोघेजण अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कोठडीमध्ये आहेत


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *