शस्त्रसंधीची घोषणा करुनही इस्रायलचा हल्ला! 100 जणांना केलं ठार, संतापलेल्या इराणने पुन्हा बंद केली होर्मुझची सामुद्रधुनी, जग पुन्हा संकटात?

Iran Closes Strait of Hormuz: अमेरिका आणि इराणने शस्त्रसंधीची घोषणा करुन 24 तास पूर्ण होत नाहीत तोवर पुन्हा एकदा होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यात आली आहे. इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यात 100 जण ठार झाल्यानंतर संतापलेल्या इराणने हा निर्णय घेण्यात आला आहे.
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्या दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधीवर सहमती झाल्याची घोषणा बुधवारी करण्यात आली. मात्र लेबनॉन या शस्त्रसंधीचा भाग नाही असा दावा अमेरिका आणि इस्रायल करत आहे. मात्र इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची पोस्ट शेअर करत लेबनॉन या कराराचा भाग असल्याचं म्हटलं आहे.
लेबनॉनवर करण्यात आलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. बेरुटवर सातत्याने हल्ला करत इराण शस्त्रसंधीचं उल्लंघन करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. लेबनीज नागरी संरक्षण दलाच्या (Civil Defense) माहितीनुसार, बुधवारी लेबनॉनभर इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमधील मृतांचा आकडा 254 वर पोहोचला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘पीबीएस न्यूज अवर’ला (PBS News Hour) सांगितलं होतं की, लेबनॉनमधील दहशतवादी गट हिजबुल्लाहमुळे लेबनॉनचा या करारात समावेश करण्यात आला नव्हता. बेरूतवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यांविषयी विचारलं असता ट्रम्प यांनी तो वेगळा मुद्दा असल्याचं म्हटलं.
इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी यापूर्वी स्पष्ट केलं होतं की, पाकिस्तानच्या मध्यस्थीने झालेल्या शस्त्रसंधी करारात इराणचा पाठिंबा असलेल्या ‘हिजबुल्लाह’विरुद्ध इस्रायलच्या सुरु असलेल्या युद्धाचा समावेश नाही. मात्र मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानने , या शस्त्रसंधी प्रस्तावात लेबनॉनचाही समावेश करण्यात आला होता असं सांगितलं आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितलं की, अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात झालेल्या युद्धविराम करारामध्ये इराणचं समर्थन असणाऱ्या दहशतवादी गट हिजबुल्लाहचा समावेश नसेल. “इराणसोबतच्या शस्त्रसंधी करारामध्ये हिजबुल्लाहचा समावेश नसेल. आम्ही हिजबुल्लाहवर हल्ले सुरूच ठेवणार आहोत,” असं नेतान्याहू म्हणाले.
नेतान्याहू यांच्या या भूमिकेला इराणने विरोध केला. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, दोन आठवड्यांसाठी करण्यात आलेल्या इराण-अमेरिका युद्धविराम कराराच्या अटी स्पष्ट आहेत आणि वॉशिंग्टनला युद्धविराम आणि इस्रायलमार्फत सुरू असलेले युद्ध यापैकी एकाची निवड करावी लागेल.
“इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धविरामाच्या अटी स्पष्ट आहेत. अमेरिकेला आता युद्धविराम, की मग इस्रायलच्या माध्यमातून सुरूच राहणारे युद्ध यापैकी एकाची निवड करावी लागेल. त्यांना दोन्ही गोष्टी एकाच वेळी मिळणं शक्य नाही. लेबनॉनमध्ये सुरू असलेले नरसंहार संपूर्ण जग पाहत आहे. आता निर्णय अमेरिकेला घ्यायचा आहे. अमेरिका आपण दिलेलं वचन पाळते की नाही, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलं आहे.”, असं अराघची यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.



