चाबहार बंदरावरील निर्बंधांमधून अमेरिकेने भारताला दिली सूट,परराष्ट्र मंत्रालयाने केले स्पष्ट…

भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापारावरून सध्या तणाव असून यादरम्यान अमेरिकेने भारताला काहीसा दिलासा दिला आहे. इराणमधील चाबहार पोर्ट प्रकल्पासाठी अमेरिकेने निर्बंध सवलत वाढवली आहे.
अमेरिकेने याआधी इराणच्या पोर्टवरील निर्बंधावर सूट रद्द करण्याची मुदत ऑक्टोबरपर्यंत दिली होती. मात्र आता याला आणखी काही महिन्यांसाठी वाढवण्यात आले आहे. इराणमधील चाबहार बंदरावर अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमधून भारताला सहा महिन्यांची सूट दिली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले.
भारताने मे २०२४ साली इराणसोबत १० वर्षांसाठी करार केला होता. ज्या अंतर्गत भारतीय पोर्ट्स ग्लोबल लिमिटेडने चाबहार पोर्ट संचलन आपल्या हाती घेतले होते. पहिल्यांदाच भारताने परदेशातील एका पोर्टची जबाबदारी घेतली होती. चाबहार पोर्ट भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण येथून पाकिस्तानला टाळत अफगाणिस्तान आणि मध्य आशियाशी थेट व्यापार मार्ग खुला होतो.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर निर्बंध लादण्यासाठी म्हणून प्रशासनाला निर्देश देत इराणच्या चाबहार पोर्टाला निर्बंधातून दिलेली सूट संपवण्यात यावी असे आदेश दिले होते. याआधी अमेरिकेने अशरफ गनी सरकार असताना भारताला अफगाणिस्तानपर्यंत माल पोहचवण्यासाठी चाबहार बंदराला निर्बंधातून सूट दिली होती. भारताने इराणच्या बंदर विकासासाठी कोट्यवधीची गुंतवणूक केली असून या बंदरामुळे भारत थेट रशियापर्यंत इंटरनॅशनल नॉर्थ आणि साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडोरशी जोडलेला आहे.
भारताने मध्य आशियापर्यंत जाण्यासाठी या बंदराला विकसित करण्याचा निर्णय घेतल होता. ट्रम्प प्रशासनाने नोव्हेंबर २०१८ साली भारताला चाबहार बंदराबाबत भारताला सूट दिली होती. मात्र तीच सूट अमेरिकेने रोखण्याचा निर्णय घेतला होता. इराणविरोधात दबाव वाढवण्याची रणनीती म्हणून चाबहार बंदराला निर्बंधातून दिली जाणारी सूट अमेरिका संपवणार होती. मात्र त्याला आणखी मुदतवाढ देण्यात आली आहे.






