गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या! मुंबई-पुण्यासह सर्वत्र लाडक्या बाप्पाचे भक्तिमय वातावरणात विसर्जन …

महाराष्ट्र : प्रथमच राज्य सरकारने गणेशोत्सवाला “राज्य महोत्सवा”चा दर्जा दिल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशात एक भरीव वाढ झाली होती. यामध्ये लोकसहभाग, डिजिटल प्रसार, आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यता आणि पर्यावरणपूरक उपक्रम यांमुळे हा उत्सव केवळ धार्मिक न राहता जगाला एकत्र आणणारा सांस्कृतिक सोहळा ठरला. याचा प्रत्यय मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रभरात साजऱ्या झालेल्या गणेशोत्सवातून साऱ्या गणेशभक्तांना अनुभवायला मिळाला.
आज अनंत चतुर्दशीनिमित्त या राज्य महोत्सवाच्या सोहळ्याला भक्तिमय वातावरणात आणि उत्साहाच्या गजरात लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देऊन परमोच्च बिंदू गाठला. घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे विसर्जन शिस्तबद्ध आणि स्नेहपूर्ण पद्धतीने विविध शहरांमध्ये साजरे झाले. अनेक ठिकाणी प्रशासनाने काटेकोर बंदोबस्त राखून सुरक्षेची पूर्ण दक्षता घेतली.
मुंबईत पार पडला भव्य विसर्जन सोहळा
मुंबईत हजारो भक्तांनी आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी रस्ते गजबजले. मुंबईचा राजा गणेश गल्ली, चिंचपोकळीचा चिंतामणी, काळाचौकीचा महगणपती, परळचा राजा यांच्या सहित लालबागच्या राजाची ९९वी विसर्जन मिरवणूक मोठ्या धूमधडाक्यात पार पडली. श्रॉफ बिल्डिंगजवळ पुष्पवृष्टी व गुलालाचा उधळण करण्यात आला. गिरगाव चौपाटीवरही घरगुती आणि सार्वजनिक गणेश मूर्तीचे विसर्जन मोठ्या उत्साहात करण्यात आले. प्रशासनाने समुद्रात जाण्याचे निर्बंध घालून लोखंडी तराफे टाकून सुरक्षितता सुनिश्चित केली. मुंबई महानगरपालिकेचे ४०० कर्मचारी सतत कार्यरत राहिले. ६,५०० पेक्षा जास्त सार्वजनिक गणपती आणि दीड लाखांपेक्षा जास्त घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले.
पुण्यात शिस्तबद्ध विसर्जन सोहळा
पुणे महानगरपालिकेच्या कृत्रिम हौदामध्ये पर्यावरणपूरकतेचा संदेश देत घरगुती गणपतींचा विसर्जन करण्यात आला. मानाचे पाच प्रमुख गणपती – कसबा गणपती , तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम, आणि तुलसीबाग गणपती, केसरीवाडा गणपती यांचे विसर्जन झाले. सकाळपासून सुरु होऊन 7 तासांच्या चाललेल्या मिरवणुकीत भक्तांनी ढोल-ताश्यांच्या गजरात आणि नृत्याच्या तालावर बाप्पाला निरोप दिला.
कोल्हापूरातील सार्वजनिक विसर्जन
कोल्हापूरमध्ये मानाचा तुकाराम माळी तालीम मंडळाचा गणपती अग्रभागी असून पालकमंत्री प्रकाश आबिटकर व खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते विधीपूर्वक पुजा केली. पारंपरिक वाद्यांच्या निनादात कोल्हापूरकरांनी बाप्पाला अत्यंत भक्तिभावनेने निरोप दिला. विसर्जन मार्गावर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला.
वाशिम आणि नंदुरबारमधील अनोखी परंपरा
वाशिममध्ये मानाचा गणपती म्हणून शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय देशमुख यांनी विधीपूर्वक पूजाअर्चा करून मिरवणुकीला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून श्री बालाजी मंदिराजवळील देव तलावात विसर्जन करण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात पर्यावरणपूरक गुलाल विहिरीत विसर्जन करण्याची अनोखी परंपरा साजरी झाली.
जालना, धाराशिव आणि परभणीत विशेष थीम विसर्जन
जालन्यात मोती तलावातून घरगुती गणपतींचे विसर्जन साजरे झाले, तर धाराशिवमध्ये देशभक्तीपर थीमद्वारे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदानाचा संदेश देणारी मिरवणूक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. परभणीत जलशुद्धीकरण केंद्राजवळील कृत्रिम तलावात सुमारे ३५० गणपतींचे विसर्जन झाले, तर संध्याकाळपर्यंत ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पर्यावरण पूरकतेचा संदेश
गणेश विसर्जनात सर्वत्र पर्यावरणपूरक पद्धतीचा जपून उपयोग करण्यात आला. कृत्रिम तलावांमध्ये मूर्तींचे विसर्जन करणे आणि खुले तलावातील प्रदूषण टाळण्याची विशेष खबरदारी घेतली गेली. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” या मंत्राने भक्तांचा उत्साह अधिकच वाढवला.
प्रशासनाचे मार्गदर्शन व सुरक्षा
संपूर्ण राज्यात पोलिस आणि प्रशासनाने विसर्जन मिरवणुकीसाठी काटेकोर सुरक्षा व्यवस्था उभी केली होती. गर्दी नियंत्रण, वाहतुकीचे नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापन यावर विशेष लक्ष ठेवण्यात आले. लोकांनी खोल समुद्रात जाण्याचे टाळावे आणि मूर्ती संबंधित अधिकृत कर्मचाऱ्यांकडे द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले.
अशा प्रकारे महाराष्ट्रभरात गणेश विसर्जन सोहळा भक्तिभावनेत, वातावरणपूरकतेत आणि ऐक्याच्या भावनेत संपन्न झाला.