पुणेमहत्वाचेमहाराष्ट्र

जी-२० बैठकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारवाडा येथून ‘समृद्ध शिक्षणाची रॅली’चा शुभारंभ


पुणे : जी-२० बैठकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘समृद्ध शिक्षणाची रॅली’ला केंद्रीय शालेय शिक्षण विभागाचे सचिव संजय कुमार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.

यावेळी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, दिग्दर्शक नागराज मंजुळे, क्रिकेटपटू राहूल त्रिपाठी आदी उपस्थित होते.

केंद्रीय शिक्षण सचिव कुमार म्हणाले, ‘जी-२०’ शिक्षण कार्यगटाच्या पुणे येथे आयोजित चौथ्या बैठकीनिमित्त ‘मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र’ या मूलभूत विषयांचे ज्ञान विद्यार्थ्यांच्या अंगी विकसित करण्याच्यादृष्टीने चर्चा करण्यात येत आहे. चांगले शिक्षण आणि आरोग्य या गोष्टीच्या बळावर आज युवावर्ग मोठ्या आव्हानांना सामोरे जाण्यास तयार आहे. पुणे शहर हे ऐतिहासिक शहर आहे. शिक्षणाचे माहेरघर म्हणूनही ओळखले जाते. येथे शिक्षणाप्रती प्रंचड तळमळ दिसून येते. त्यामुळे देशातही शिक्षण क्षेत्रामध्ये पुण्याचे नाव अग्रस्थानी आहे, असेही श्री. कुमार म्हणाले.

शिक्षण आयुक्त मांढरे म्हणाले, ‘जी-२०’ शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीत विविध देशाचे सुमारे २० देशापेक्षा जास्त देशाचे प्रतिनिधी उपस्थित राहिले आहेत. भारत देश विश्वगुरु होत असताना शिक्षण आणि खेळ महत्वपूर्ण बाबी आहेत. नवीन शैक्षणिक धोरण आणि त्याअनुषंगाने घेण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविणे आणि अधिकाधिक नागरिकांनी यामध्ये सहभागी होण्याच्यादृष्टीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

दिग्दर्शक मंजुळे म्हणाले, देशाच्या उन्नती आणि प्रगतीमध्ये शिक्षणाचे महत्व मोठे आहे. जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर आयोजित समृद्ध शिक्षणाची रॅलीचा निश्चित आपल्याला फायदा होईल. आपल्या ज्ञानातही भर पडेल, असे मंजुळे म्हणाले.

रॅलीला शनिवारवाडा येथून सुरुवात करण्यात आली. लाल महल चौक – क्रांती चौक – तांबडी जोगेश्वरी मंदिर- अप्पा बळवंत चौक – प्रभात टॉकीज- फुटका बुरुज मार्गे पुणे मनपा भवन येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये विविध विद्यालयाचे पारंपरिक वेषभूषा परिधान केलेले विद्यार्थी, एनसीसी, स्कॉउट, गाईड पथक आदी सहभागी झाले होते.

बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, योजना संचालक महेश पालकर, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे संचालक संपत सूर्यवंशी, कुस्तीपट्टू काका पवार, बुद्धिबळपटू मृणाली कुंटे, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू अभिषेक केळकर, बॅडमिंटनपटू निखिल कानेटकर, बुद्धिबळ ग्रँडमास्टर हर्षित राजा, अभिमन्यू पुराणिक आदी यावेळी उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *