नशीब म्हणतात ते यालाच ! फडणवीस हेलिकॉप्टर अपघातातून ‘सातव्यांदा’ बचावले; सर्व थरारक प्रसंग
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यामागे लागलेले हेलिकॉप्टर अपघातांचे शुक्लकाष्ठ काही केल्या थांबायला तयार नाही. 2017 पासून ते जवळपास सातव्यांदा अपघातातून बचावले आहेत.
गडचिरोलीमध्ये पुन्हा एकदा ते मोठ्या दुर्घटनेतून थोडक्यात बचावले आहेत. (Devendra Fadnavis has survived a helicopter crash for the seventh time since 2017.)
गडचिरोली (Gadchiroli News ) जिल्ह्यातील वडलापेठ येथील सुरजागड इस्पात प्रा.लि. या आयरन स्पोंज उत्पादन करणाऱ्या कारखान्याचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. या सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ( Ajit Pawar ) एकाच हेलिकॉप्टरमधून पोहोचले होते. पण इथे पोहचण्यापूर्वी त्यांचे हेलिकॉप्टर हवेतच भरकटले होते. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा किस्सा सांगितला. मात्र पायलटच्या प्रसंगावधानाने हे दोघेही सुखरुप गडचिरोलीला पोहचले. मात्र फडणवीस हे हेलिकॉप्टर अपघातातून बचावण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.
कधी, कुठे आणि कसे बचावले देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचा सगळ्यात पहिला अपघात झाला तो मे 2017 मध्ये. 10 मे 2017 रोजी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस गडचिरोली दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. हवेतच बिघाड झाल्याने पायलटने प्रसंगावधान दाखवत इमर्जन्सी लँडिंग केले होते. त्यामुळे त्यांना कारने नागपुरला जावे लागले होते.
25 मे 2017 रोजी फडणवीस यांचा आजवरचा सर्वात मोठा हेलिकॉप्टर अपघात झाला होता. निलंगा येथे हेलिकॉप्टर सुमारे शंभर मीटर उंचीवर असतानाच ते नजिकच्या झोपडपट्टीच्या दिशेने कोसळले. एकच हाहा:कार उडाला. पोलीस प्रशासन, अग्निशमन दल या सर्वांनीच झोपडपट्टीच्या दिशेने धाव घेतली. मात्र पोलीस आणि मैदानावरील कार्यकर्ते झोपडपट्टीत पोहोचण्यापूर्वीच तेथे उपस्थित असलेले नागरिक इरफान शेख यांनी हेलिकॉप्टरचे दार काढून फडणवीस यांच्यासह सहा जणांना बाहेर काढले.त्यानंतर किरकोळ तपासण्या झाल्यानंतर ते विमानाने मुंबईला रवाना झाले.
11 जानेवारी 2018 रोजी देवेंद्र फडणवीस विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमाला भाईंदरमध्ये आले होते. त्यावेळीही त्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात थोडक्यात टळला. एका शाळेच्या पटांगणावर देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर उतरणार होते. त्यावेळी हेलिकॉप्टर खाली उतरत असतानाच पायलटच्यादृष्टीस इमारतींच्यामध्ये लोंबकळणारी एक केबल दिसली. ही केबल दिसताच पायलटने प्रसंगावधान राखत हेलिकॉप्टर पुन्हा वर नेले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. ही केबल हेलिकॉप्टरच्या पंख्यात अडकली असती तर मोठा अपघात होण्याची शक्यता होती.
7 जुलै 2018 रोजी शेकापचे तत्कालिन आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि नाट्यगृहाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी देवेंद्र फडणवीस अलिबागला गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर तत्कालिन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यासह ते मुंबईला परतण्यासाठी निघाले. त्यावेळी फडणवीस हेलिकॉप्टरमध्ये चढण्यासाठी पाऊल ठेवणार तेवढ्यात हेलिकॉप्टर लँडिंग मार्कच्या पुढे सरकले. अचाकन घेतलेल्या उड्डाणाने मागील पाते फडणवीस यांच्या डोक्याला लागण्याचा धोका उद्भवला होता. पण सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखून तातडीने त्यांना सुरक्षितस्थळी नेल्याने बाका प्रसंग टळला.
11 ऑक्टोबर 2019. विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरावर होता. देवेंद्र फडणवीस हे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत हेलिकॉप्टरने रायगड जिल्ह्यातील पेणला गेले होते. बोरगाव येथे लॅण्ड झाल्यावर हेलिपॅडवरची चाके अचानकपणे मातीत रुतली. पाऊस झाल्याने सर्व जमीन ओली झाली होती. त्यामुळे पायलटचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले. मात्र प्रसंगावधान दाखवत पायलटने पुन्हा हेलिकॉप्टरवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठा अपघात टळला होता.
30 जून 2023. जामनेर तालुक्यातल्या गोदरी गावात महाकुंभाचा समारोप सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि योगगुरु बाबा रामदेवही उपस्थित होते. या कार्यक्रमाला जाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईहून रवाना होण्यासाठी विमानात बसले. पण अचानक त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. सुदैवानं विमान टेकऑफच्या आधीच ही गोष्ट पायलटच्या लक्षात आली आणि अचानक त्यांचे विमान थांबवले गेले. आता आज ते सातव्यांदा अपघातातून बचावले आहेत.